बोगस कृषिमित्र भरती
प्रकरणात दोघे ताब्यात
वाशीम पोलिसांची कारवाई, जूनमध्ये झाली होती तक्रार
ॲग्रोवन वृत्तसेवा
वाशीम : एका खासगी संस्थेच्या पुढाकाराने राज्यात ‘कृषी मित्र’ भरती प्रकरणी घेतलेली परीक्षा व त्याठिकाणी आढळून आलेल्या क्राॅप बुस्टर प्रकरणात दाखल तक्रारीवरून पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून दोघांना ताब्यात घेतले. २८ जून रोजी येथे परीक्षा केंद्रावर छापा मारत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिस तक्रार दिली होती.
वाशीम पोलिसांनी कंपनी संचालक दत्ता पांडुरंग जाधव व गजानन पांडुरंग जाधव या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणात मंगळवारी (ता. १) वाशीम शहर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. ‘कृषी मित्र’ भरती प्रकरणात वाशीमसह पुणे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, बुलडाणा या जिल्ह्यांतही याच प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
कृषी आयुक्तालयाच्या निर्देशानुसार कृषी विभागाच्या पथकाने महात्मा फुले कृषी विकास केंद्र (छत्रपती संभाजीनगर) यांच्या माध्यमातून आयोजित ‘कृषी मित्र’ भरती परीक्षेदरम्यान तपासणी केली होती. या पथकात जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी अभिजित देवगिरकर, गुणनियंत्रण कृषी अधिकारी शिवाजी जाधव, पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा खत निरीक्षक अरुण मुंदडा यांचा समावेश होता. तपासणीदरम्यान परीक्षार्थींना क्राॅप बुस्टर वितरित करण्यात आल्याचे आढळून आले होते. अधिकाऱ्यांनी नमुने घेत पंचनामाही केला होता.
युवकांची फसवणूक
उत्पादनासाठी आवश्यक वैधानिक परवान्यांबाबत शंका निर्माण झाल्याने तसेच बोगस भरतीच्या माध्यमातून बेरोजगार युवकांची फसवणूक आणि कृषी निविष्ठांच्या वितरणासंदर्भातील गंभीर बाबी लक्षात घेऊन पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा खत निरीक्षक मुंदडा यांनी तक्रार दिली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.