विशेष
निरोगी मेंदू, सशक्त समाज!
भाग्यश्री फडके-धर्माधिकारी
-------------------------------------------
लीड
आपण सहसा मेंदूच्या आजारांकडे कळत-नकळत दुर्लक्ष करतो. मेंदूचे आरोग्य वयाच्या प्रत्येक टप्प्यावर जपले गेलेच पाहिजे. इतर अवयवांप्रमाणे आपल्या मेंदूलाही सक्रिय, सतर्क आणि निरोगी राखण्यासाठी योग्य पोषण आणि उपचारांची आवश्यकता असते. आहार मेंदूच्या आरोग्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.
-------------------------------------------
अलीकडेच २२ जुलैला जागतिक मेंदू दिवस साजरा केला गेला. यंदाची संकल्पना आहे - ब्रेन हेल्थ : ॲक्सेस फॉर ऑल, अर्थात मेंदूच्या आरोग्यासाठी लागणारी अत्यावश्यक आरोग्यसुविधा सर्वांसाठी उपलब्ध असणे. विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रगती होऊन शास्त्रज्ञांनी मेंदूविषयी बरेच संशोधन केले आहे, तरीही जगभरातील अब्जावधी लोकांना अजूनही मेंदूची अत्यावश्यक औषधे सहज उपलब्ध होत नाहीत. जगभरात ३.४ अब्जाहून अधिक लोक मेंदूच्या आजारांनी त्रस्त आहेत. मेंदू व मज्जासंस्थेचे उपचार कित्येक देशांत, प्रदेशांत, समूहांमध्ये असमान पद्धतीने उपलब्ध आहेत, त्यामुळे अनेकांना मेंदूच्या आजारावरची महाग औषधे परवडत नाहीत. अनेकदा प्रशिक्षित तज्ज्ञांचा अभाव असतो, डॉक्टरांना भेटण्यासाठी खूप वेळ थांबावे लागते, अनेकांना मेंदूचा आजार कलंक वाटतो आणि अनेक ठिकाणी अत्यंत मर्यादित प्रमाणात वैद्यकीय सेवा उपलब्ध असतात.
तसे बघायला गेले, तर भारतामध्येही मेंदू आणि मज्जातंतूंच्या आजारांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. दर एक हजार लोकांमागे तब्बल १४ ते १७ लोकांना गंभीर मेंदूचे आजार आहेत. हे प्रमाण जागतिक प्रमाणाच्या (एक हजार लोकांमागे पाच ते आठ लोक) जवळपास दुप्पट आहे. आपल्या देशात पक्षाघात हा मृत्यू आणि अपंगत्वाला कारणीभूत ठरणारा मोठा आजार आहे. पक्षाघाताचे प्रमाणही वाढत आहे. आयसीएमआरच्या अहवालानुसार, वर्षाला १.२ दशलक्षाहून अधिक नवीन पक्षाघाताचे रुग्ण आढळत आहेत. ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ८.८ दशलक्षाहून अधिक लोकांना स्मृतिभ्रंश आहे. हा आकडा २०५०पर्यंत ११.४ दशलक्ष होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच सुमारे ६० ते ८० लाख लोक अपस्माराने ग्रासलेले आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे ब्रेन ट्यूमरच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे.
मेंदूचे आरोग्य का आवश्यक?
जागतिक पातळीवर मज्जासंस्थेचे आजार अपंगत्वाचे आणि मृत्यू होण्यासाठीचे दुसरे मोठे कारण ठरत आहेत. मेंदूचे आरोग्य कुठल्याही वैद्यकीय उपचारांमध्ये अग्रणी असते. मानवाला शिक्षण घेण्यासाठी, काम करण्यासाठी, कुटुंबाची देखभाल करण्यासाठी, समाजामध्ये मिसळण्यासाठी सुदृढ आणि निरोगी मेंदूची आवश्यकता असते. मज्जासंस्थेच्या अनेक आजारांचे लवकर निदान झाले, त्यांचे धोके नियंत्रणात आणले, निरोगी जीवनशैली स्वीकारली, स्थानिक वैद्यकीय सेवा सुधारल्या आणि त्या वेळीच उपलब्ध करून दिल्या, तर पुढचे संभाव्य धोके आणि मृत्यू टाळता येऊ शकतो व चांगल्या प्रकारे बरे वाटू शकते. त्यामुळे मज्जासंस्थेच्या आरोग्यामध्ये गुंतवणूक करणे म्हणजे प्रत्यक्ष लोकांमध्येच गुंतवणूक करण्यासारखे आहे. त्यामुळे लोकांना त्यांच्या पूर्ण क्षमतेनिशी काम करता येते आणि सुदृढ समाजाची पायाभरणी होते.
भारतातील अनेक लोकांमध्ये मानसिक आरोग्याचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रौढ लोकसंख्येच्या सुमारे १५ टक्के लोकांना सक्रिय हस्तक्षेपाची आवश्यकता आहे. ग्रामीण भागांच्या (६.९ टक्के) तुलनेत शहरी भागांमध्ये मानसिक आरोग्य विकारांचे प्रमाण जवळजवळ दुप्पट म्हणजे १३.५ टक्के आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, केवळ मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर २०१२ ते २०३० या काळात जवळजवळ ८५ लाख कोटी रुपयांचा भला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
भारताकडून प्रयत्न सुरू
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ ॲण्ड न्यूरोसायन्सेस संस्था आणि कर्नाटक सरकारच्या संयुक्त विद्यमाने कर्नाटक ब्रेन हेल्थ इनिशिएटिव्ह (KaBHI) हा पायलट प्रोजेक्ट राबवला जात आहे. याअंतर्गत ग्रामीण आणि निमशहरी भागांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या डॉक्टरांना व परिचारिकांना प्रशिक्षण दिले जात आहे. ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये पक्षाघात, अपस्मार आणि तीव्र डोकेदुखी यांसारख्या आजारांचे वेळेत निदान करून स्थानिक पातळीवरच उपचार उपलब्ध करून दिले जात आहेत.
गुरुग्राममधील मानेसर शहरातील नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर येथे नॅशनल डिमेंशिया सायन्स प्रोग्रामअंतर्गत भारतातील वृद्धांच्या मेंदूचा अभ्यास करण्यासाठी पहिला पूर्णपणे भारतीय डेटाबेस तयार केला जात आहे. यात प्रामुख्याने ग्रामीण आणि इंग्रजी न बोलणाऱ्या ६,०००हून अधिक लोकांच्या मेंदूचे ३टी एमआरआय स्कॅन करून स्मृतिभ्रंश आणि अल्झायमरच्या सुरुवातीच्या लक्षणांचा शोध घेतला जात आहे. आयआयटी मद्रासच्या ब्रेन सेंटरने सुपर कॉम्प्युटरच्या मदतीने मानवी मेंदूचा पेशी पातळीवरील पहिला डिजिटल त्रिमितीय ३D नकाशा तयार केला आहे, यामुळे न्यूरोसर्जरी अधिक अचूक आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे. गंभीर न्यूरोलॉजिकल आणि ट्रॉमा केसेस हाताळण्यासाठी काही प्रमुख संस्थांना जिल्हा आणि तालुका रुग्णालयांशी जोडले जात आहे. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णाला मोठ्या शहरात जाण्याची गरज न पडता तातडीने तज्ज्ञ न्यूरोलॉजिस्टचे मार्गदर्शन मिळणे शक्य झाले आहे.
महाराष्ट्रातील स्थिती
नीती आयोगाने देशभरात सुरू केलेल्या एडीपी/एबीपी ब्रेन हेल्थ इनिशिएटिव्हअंतर्गत निवडक दहा राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मानसिक आरोग्याला स्थानिक पातळीवर प्राधान्य दिले जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील डॉक्टरांना मेंदूच्या आजारांचे लवकरात लवकर निदान करण्यासाठी प्रशिक्षित केले जात आहे. महाराष्ट्रात मानसिक आणि मेंदूच्या आरोग्यासाठी टेली-मानस ही टोल-फ्री सेवा उपलब्ध आहे. महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाच्याअंतर्गत राज्यातील प्रमुख मानसिक आरोग्य रुग्णालय आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज केले जात आहे. महाराष्ट्रातील जिल्हा रुग्णालयांमध्ये इमर्जन्सी आणि ट्रॉमा केअर सेंटर्सचे जाळे मजबूत केले जात आहे. मेंदूला मार लागल्यास किंवा पक्षाघाताचा झटका आल्यास पहिल्या काही तासांत (गोल्डन अवर) रुग्णावर स्थानिक पातळीवरच योग्य उपचार व्हावेत, यासाठी नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेन्शन ॲण्ड कंट्रोल ऑफ स्ट्रोक अंतर्गत जिल्ह्यांमध्ये सीटी स्कॅन आणि थ्रोम्बोलिसिसची (रक्ताची गुठळी विरघळवणारी प्रक्रिया) सुविधा मोफत उपलब्ध करून दिली जात आहे.
सुदृढ मेंदूसाठी
आपण सहसा मेंदूच्या आजारांकडे कळत-नकळत दुर्लक्ष करतो. डोक्याला काही होत असेल, डोकेदुखी होत असेल तर घरगुती उपायांवर अथवा पॅरासिटामॉल, वेदनाशामक औषधे घेण्यावर भर दिला जातो. परंतु मेंदूचे काही आजार नाहीत ना, यासाठी मेंदूची नियमित तपासणी करून घेणे गरजेचे आहे. धावपळीच्या जीवनशैलीमुळे, मोबाईलच्या सतत वापरामुळे विसरभोळेपणा, एका जागी लक्ष केंद्रित न होणे, मन स्थिर न राहता सतत विचलित होत राहणे यांसारख्या समस्या अनेकजणांना जाणवतात. विक्षिप्त वर्तन, मुलांमधील अतिचंचलता, सतत राग येणे, चिडचिडेपणा, विचारांचे असंतुलन, विस्मरण, स्किझोफ्रेनिया, सायकोसिस, अपस्मार, अल्झायमर या गंभीर समस्या जाणवत असतील, तर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
मेंदूचे आरोग्य वयाच्या प्रत्येक टप्प्यावर जपले गेलेच पाहिजे. इतर अवयवांप्रमाणे आपल्या मेंदूलाही सक्रिय, सतर्क आणि निरोगी राखण्यासाठी योग्य पोषण आणि उपचारांची आवश्यकता असते. आहार मेंदूच्या आरोग्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. योग्य आहार घेतल्यामुळे मेंदूचे कार्य, स्मरणशक्ती, एकाग्रता आणि शिकण्याची क्षमता वाढण्यास मदत मिळते. निरोगी चरबी, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे हे घटक मेंदूच्या पेशींचे संरक्षण करण्यास, त्यांच्यातील संवाद सुधारण्यास आणि मेंदूच्या दीर्घकालीन आरोग्य जपण्यास मदत करतात. आहारात अक्रोड, हळद, अंडी, हिरव्या पालेभाज्या, मासे, धान्ये, बदाम, भोपळ्याच्या व सूर्यफुलाच्या बिया, जवस, रंगीत फळे यांचा समावेश करावा. परंतु, वारंवार स्मरणशक्ती कमी होऊन दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल, नवीन माहिती शिकण्यात अडचण येत असेल, ओळखीच्या ठिकाणी हरवून जाण्याची शक्यता बळावली असेल, अचानक व्यक्तिमत्त्व किंवा वर्तन बदलेले जाणवले, तर ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.
मानसिक आजार होऊ नयेत म्हणून घ्यावयाची काळजी
मन आपल्या शरीराचा अविभाज्य भाग आहे. मानसिक आरोग्याचे आजार होऊ नयेत म्हणून आपण आपल्या मनाची काळजी घेतली पाहिजे. सतत उदास वाटणे, सामाजिक संबंध कमी करणे, खाण्याच्या व झोपण्याच्या सवयींमध्ये बदल होणे, आत्महत्येचे विचार येणे, एकाकीपणाची भावना निर्माण होणे, अतिविचार करणे, अपराधीपणाची भावना वाटणे, मूडस्विंग होणे, भ्रम होणे ही लक्षणे जाणवत असतील तर लगेच आपल्या जवळच्या व्यक्तींशी, कुटुंबियांशी, मित्रांशी बोलावे किंवा चर्चा करावी. तरीही बरे वाटत नसेल, तर मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे आणि औषधोपचार सुरू करणे आवश्यक ठरते. निरोगी मेंदू आणि निरोगी मन सुदृढ पिढी घडवण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे आपण आपल्या व इतरांच्या मेंदूच्या आरोग्याविषयी अधिक सजग राहू या.
संदर्भ -
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1587137®=48&lang=2
https://journals.lww.com/neur/fulltext/2014/62060/epidemiology_of_neurological_disorders_in_india_.2.aspx?
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC11504765/
https://www.thehindu.com/news/national/karnataka/world-brain-health-day-stroke-management-and-head-injury-care-to-be-provided-on-a-hub-and-spoke-model-in-karnataka/article69839029.ece
https://graam.org.in/building-brain-health-from-the-grassroots-indias-next-aspirational-frontier/
https://www.apollohospitals.com/mr/health-library/memory-boosting-foods
https://www.yashodahospitals.com/mr/blog/understanding-mental-health/
----
लेखिका मुंबईस्थित औषधनिर्माण आणि आरोग्यसेवा व्यवस्थापनात कार्यरत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.