पुणे

मुलाखत

CD

अमृतमयी मराठीचे भवितव्य उज्ज्वलच!
गांभीर्यपूर्वक वाचन करणारा वर्ग प्रत्येक पिढीत टक्केवारीच्या हिशेबाने कायम असतो. हीच मंडळी मराठीच्या एकूण गोमटेपणाला धीरोदात्तपणे, हळूहळू पुढे नेत राहतील. साहित्य संमेलनाच्या दरवर्षी होणाऱ्या उत्सवाबाबत तरुण व नव्या पिढीला आस्था वाटत असली, तरी संमेलनाशी स्वतःला जोडून घ्यावे असे त्यांना क्वचितच वाटत असावे. म्हणूनच साहित्य संमेलनांत तरुणांची उपस्थिती कमी असते. मात्र, समाज पुन्हा एकदा ग्रंथप्रेमाकडे व वाचन संस्कृतीकडे वळत असल्याचे चित्र आशादायक आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर हा बदल घडताना दिसतो. हा सूचक व शुभ संकेत मानता येईल.
- भारत सासणे
-----
मराठी भाषा अभिजात होतीच आणि त्यामुळेच आपण पुरावे सादर करू शकलो आहोत. समर्थ पुराव्यांमुळे उशिरा का होईना, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. अर्थात, मराठी भाषेला केंद्राने प्रमाणित करावे, अशी परिस्थिती कधीच नव्हती. आपली भाषा अभिजात आहेच, असे माझ्यासह सर्वजण सांगत होते. तथापि अस्मिता जपण्यासाठी अभिजात भाषेचा दर्जा मिळणे आवश्यक होते आणि त्यानुसार हा दर्जा मिळाला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, आता पुढे काय असा प्रश्न अनेक जणांनी उपस्थित केला आहे. काही संस्थांनी असा अभ्यास नोंदविला आहे की, मराठीच्या आधी ज्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्या राज्यांमध्ये भाषेसंदर्भात कोणतीही क्रांती झालेली नाही. त्या राज्यांना अल्पसा अनुदानपुरवठा जरूर झाला असला, तरी भाषा संवर्धनासाठी विशेष कार्य झाल्याचे आढळून आलेले नाही. मराठी भाषेला तर हा दर्जा प्राप्त होऊन अवघे एक वर्ष झाले आहे. आपल्या राज्यात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्तीनंतर भाषा संवर्धनाच्या अनुषंगाने त्वरित काही विशेष घटना घडून येतील असे मानण्याचे कारण नाही. मात्र त्या अनुषंगाने काही चिंतन नोंदविले पाहिजे. या चिंतनाच्या अनुषंगाने मराठी भाषेची सध्याची स्थिती, वाचन संस्कृती व समाजाची मानसिकता याबाबत काही मंथन करणे शक्य होणार आहे. उदाहरणार्थ, मराठी भाषा प्रांतनिहाय बदलत राहते, हे आपल्याला माहीत आहे; मात्र महानगरांत उच्चवर्गीय व मध्यमवर्गीयांमध्ये इंग्रजीचा ओढा वाढलेला दिसतो. त्यामुळे ते इंग्रजी माध्यमात शिकताना दिसतात आणि त्यांच्या कथित पर्यावरणात मराठी भाषा दुय्यम ठरलेली आढळते.

बहुजन समाज मराठी टिकवून
याच्या उलट, कनिष्ठ मध्यमवर्ग, महानगरांव्यतिरिक्त पसरलेल्या विस्तृत प्रदेशात राहणारा बहुजन समाज या-ना-त्या स्वरूपात तसेच प्रादेशिक बोलींच्या माध्यमातून मराठी भाषा सहजपणे टिकवून आहे. या मंडळींना मराठीच्या

अभिजात भाषेच्या दर्जाची कधीच आवश्यकता वाटलेली नाही. त्यांच्या सहज जीवनव्यवस्थेत विचार, व्यवहार व वर्तनातून संतवचने तसेच मराठी परंपरा आपोआप अवतरित होतात. मराठी भाषेची गोडी सामान्य माणसाच्या मनामध्ये अकृत्रिम पद्धतीने टिकून आहे. आता वाचन संस्कृतीचा विचार केल्यास, सामान्यतः दोन चित्रे आपल्या समोर येतात. तरुण पिढीचे वाचन कमी झाल्याचे सर्रास म्हटले जाते. त्यामध्ये काही अंशी तथ्य असले, तरी जी वाचन संस्कृती टिकून आहे, ती कोणत्या प्रकारची आहे हे पाहिले पाहिजे. एकतर अभिजात, जड वैचारिक, आध्यात्मिक जीवनव्यवस्थेशी संबंधित साहित्य वाचणारी पिढी अस्तंगत होताना दिसते. मधल्या काळातील व सध्या पन्नाशीला आलेली पिढी गंभीर वाचन प्रवृत्तीपासून दुरावलेली दिसते. अनुवादित साहित्य, विशेषतः लोकप्रिय इंग्रजी रहस्यकथा व रोमांचकारी साहित्य यांकडे त्यांचा वीस वर्षांपूर्वी कल निश्चित झाला होता. त्यामुळे अभिजात इंग्रजी साहित्याचे अनुवाद मोठ्या प्रमाणात होत नाहीत. झालेच तरी त्याचे विस्तृत वाचन होत नाही, असे निरीक्षण आहे. म्हणजेच कठीण, संघर्षमय जीवनस्थितीतून सुसह्य मार्ग शोधण्याचा प्रयत्न नव्या पिढीने केलेला असावा. त्यानंतरची नवी पिढी तर प्रामुख्याने समाजमाध्यमांवरील अल्पाक्षरी वाङ्मय वाचण्यात रस घेताना दिसते.

भाषेचा सन्मान आणि शुद्धता
मराठी भाषेचा सन्मान व मराठी भाषेची शुद्धता याबाबत समाजाने जागरूक राहिले पाहिजे, असे नेहमी म्हटले जाते. प्रत्यक्षात मात्र आपण सतत अशुद्ध मराठी वापरत असतो आणि त्याबाबत फारशी चिंता व्यक्त होताना दिसत नाही. उदाहरणार्थ, आपण एखाद्याला मोबाईलवर संपर्क केलेला असताना फोन सतत व्यग्र असल्यास असे ऐकवले जाते की, ‘तुम्ही ज्या व्यक्तीला फोन केलेला आहे, ती व्यक्ती दुसऱ्या कोणाशी तरी बोलत आहे.’ प्रत्यक्षात ‘तो व्यक्ती’ असे म्हणणे योग्य आहे. इंग्रजीतून हिंदीत आणि हिंदीतून मराठीत अनुवाद होत असताना कोणतीही भाषिक तपासणी किंवा काळजी घेतली जात नाही, असे दिसते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरही जाहीरपणे अशा व्याकरणाच्या चुका आपण वापरत आहोत. भाषेचा अभिमान असतानाही भाषेची अवहेलना कोणाच्या लक्षात येत नाही, हा चिंतेचा विषय आहे. मागील पिढीने दीर्घकाळ कीर्तनांतून व व्याख्यानमालांतून विविध भाषिक संस्कार स्वीकारले आहेत. त्याचबरोबर चिकित्सक अभ्यासाचे विविध उपक्रमही राबविले आहेत. उदाहरणार्थ, महाभारताचा चिकित्सक अभ्यास गेली कित्येक वर्षे मागील पिढीकडून सातत्याने सुरू आहे. अशा प्रकल्पांतून भाषेविषयीचे धीरोदात्त गांभीर्य प्रसारित होत राहिले आहे. अलीकडे मात्र नवी पिढी अशा उपक्रमांपासून दूर जाताना दिसते. त्यामुळे ग्रंथप्रेम, सतत वाचन करण्याची प्रवृत्ती, अभ्यास व अध्ययनाची ओढ इत्यादी गुण अस्तंगत होत आहेत की काय आणि त्यामुळे मराठी भाषेचे भवितव्य आव्हानात्मक ठरेल का, अशी शंका व्यक्त केली जाते. तथापि असे असले तरीही पुन्हा एकदा समाजात काही सकारात्मक बदल घडताना दिसत आहेत. ही जमेची बाजू आहे.

वाचणारी पिढी कायम...
जुन्या मराठीत लिहिलेले अभिजात ग्रंथ व कादंबऱ्या आता कोण वाचणार, असा प्रश्न चर्चेतून उपस्थित होतो. ही चिंता स्वाभाविक व योग्यच आहे. मात्र वाचन संस्कृतीचे उच्चाटन होईल असे म्हणता येणार नाही. गांभीर्यपूर्वक वाचन करणारा वर्ग प्रत्येक पिढीत टक्केवारीच्या हिशेबाने कायम असतो. हीच मंडळी मराठीच्या एकूण गोमटेपणाला धीरोदात्तपणे, हळूहळू पुढे नेत राहतील, असे वाटते.
साहित्य संमेलनाच्या दरवर्षी होणाऱ्या उत्सवाबाबत तरुण व नव्या पिढीला आस्था वाटत असली, तरी संमेलनाशी स्वतःला जोडून घ्यावे असे त्यांना क्वचितच वाटत असावे. म्हणूनच साहित्य संमेलनांत तरुणांची उपस्थिती कमी असते, असे म्हटले जाते. तथापि नॅशनल बुक ट्रस्टचे (एनबीटी) पुस्तक मिळावे म्हणून होणाऱ्या पुस्तक जत्रेचा अनुभव वेगळा आहे. आबालवृद्ध या पुस्तक जत्रेत मोठ्या संख्येने हजेरी लावताना दिसतात. पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. म्हणजेच समाज पुन्हा एकदा ग्रंथप्रेमाकडे व वाचन संस्कृतीकडे वळत आहे, असे म्हणता येते आणि हे आशादायक चित्र आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर हा बदल घडताना दिसतो. हा सूचक व शुभ संकेत मानता येईल.

चौकट
वाचन, लेखन वाढावे
मराठी शाळांमधील परिस्थिती काय, याबाबत अनेकदा चर्चा होते. त्या संदर्भात काही गंभीर इशारे दिले गेले आहेत. तज्ज्ञांनी असे निदर्शनास आणून दिले आहे की, कोरोनाच्या महामारीनंतर सातत्याने दूरस्थ तंत्रज्ञानाच्या आधारे शिक्षण दिल्यामुळे लेखनाची सवय संपुष्टात आली आहे. चांगले व ओघवते वाचनही सहसा कमी झालेले दिसते. लिहिण्याची सवय नसेल, तर अर्थातच शुद्ध लेखन होणार नाही, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. ही परिस्थिती मराठी माध्यमातील शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची व गांभिर्याने घेतली पाहिजे.
(शब्दांकन ः शिवाजी यादव)
---
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (२०२२) माजी अध्यक्ष आहेत.)
----
देशातील अभिजात भाषा
तमीळ : (२००४)
संस्कृत : (२००५)
कन्नड : (२००८)
तेलुगू : (२००८)
मल्याळम: (२०१३)
उडिया : (२०१४)
मराठी : (२०२४)
पाली : (२०२४)
प्राकृत : (२०१४)
आसामी : (२०१४)
बंगाली: (२०१४)
----
दर्जाचा फायदा
- अभिजात भाषेचा दर्जा भाषेच्या प्राचीन, समृद्ध आणि स्वतंत्र साहित्यिक परंपरेला दिला जातो, ज्यासाठी भारत सरकारकडून विशेष मदत मिळते.
- यामुळे भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी, तिच्या साहित्याच्या जतनासाठी आणि संशोधनासाठी निधी उपलब्ध होतो.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avian Influenza: देशात एव्हीयन इन्फ्लूएंझा व्हायरसची एन्ट्री! चिकन आणि अंडी विक्रीवर बंदी; 'हे' नियम पाळले नाहीत तर मोठा धोका

ती मला भेटायला का नाही आली? घराला कुलूप, अचानक झाली गायब; रजनीकांत यांचं ते प्रेम ज्याचा घाव आजही ताजा आहे

Pune Traffic Police : नववर्षाच्या रात्री पुण्यात ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’वर धडक कारवाई; २०८ मद्यधुंद वाहनचालकांवर गुन्हे!

Government Decision on Gig Workers : ‘गिग वर्कर्स’बाबत सरकारचा मोठा निर्णय! ‘Social Security Cover’सह बरच काही मिळणार मात्र...

Junnar Migratory Bird : युरोपातून येणाऱ्या रेड क्रेस्टेड पोचार्डची जुन्नर तालुक्यात प्रथमच नोंद; जैवविविधतेसाठी ऐतिहासिक क्षण!

SCROLL FOR NEXT