आळेफाटा, ता. १९ : दोन महिन्यांपूर्वी प्रतिकिलो २० रुपयांपर्यंत भाव मिळवून देणाऱ्या कोबी पिकाला सध्या अवघा एक ते दीड रुपये किलो भाव मिळत आहे. काढणीसाठीच प्रतिकिलो सुमारे दोन रुपये खर्च येत आहे. त्यामुळे कोबी बाजारात विक्रीसाठी पाठविण्यापेक्षा उभ्या पिकात मेंढरांचे कळप सोडणे शेतकऱ्यांना परवडू लागले आहे. एकरी सुमारे ८० हजार रुपये खर्च करूनही उत्पादनातून खर्च वसूल होत नसल्याने जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील कोबी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात यंदा अनेक शेतकऱ्यांनी कोबी लागवडीला प्राधान्य दिले होते. सुरुवातीला चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाची आशा होती. मात्र, बाजारात आवक वाढू लागल्याने दरात सातत्याने घसरण झाली. २० रुपयांवरून १५, त्यानंतर १० रुपये आणि आता थेट एक ते दीड रुपये किलोपर्यंत भाव खाली आला आहे.
कोबी लागवडीपासून काढणीपर्यंत मशागत, बेड तयार करणे, रोपे, खते, कीटकनाशके, औषध फवारणी, पाणी आणि मजुरी यासाठी मोठा खर्च करावा लागतो. एकरी सुमारे ८० हजार रुपये खर्च येतो. पाण्याचे नियोजन करून शेतकऱ्यांनी पीक जगविले; मात्र बाजारभाव कोसळल्याने सर्व आर्थिक गणित बिघडले आहे. सध्या काढणीचा खर्चच किलोमागे दोन रुपये होत असल्याने वाहतूक खर्चासह विक्री करणे परवडत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी उभ्या पिकात मेंढरांचे कळप सोडत आहेत. मेहनतीने वाढविलेला भाजीपाला जनावरांच्या चाऱ्यासाठी देण्याची वेळ आली आहे.
फ्लॉवर आणि कोबीचे गेल्या अनेक दिवसांपासून बाजारभाव पडलेले आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन भाजीपाला उत्पादकांना दिलासा देणे गरजेचे आहे.
- कैलास गायकर, शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.