करिअर संधींवर आजपासून
दोन दिवसीय ब्रीज कोर्स
सोलापूर विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागाचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
करकंब, ता. १६ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागातर्फे प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम उषा) अंतर्गत ‘करिअर क्षितिजे : पर्यावरणशास्त्र, भूगर्भशास्त्र आणि जिओइन्फॉरमॅटिक्स क्षेत्रातील संधी’ या विषयावर दोन दिवसीय ब्रीज कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार व बुधवारी (ता. १७ व १८) विद्यापीठाच्या रंगभवन सभागृहात हा कोर्स होणार असल्याची माहिती भूशास्त्र विभागाचे डॉ. विनायक धुळप यांनी दिली.
या ब्रीज कोर्सच्या माध्यमातून भूविज्ञान, पर्यावरणशास्त्र व जिओइन्फॉरमॅटिक्स या क्षेत्रांतील आधुनिक करिअर संधी, संशोधनाच्या नव्या दिशा तसेच उद्योग क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्यांविषयी विद्यार्थ्यांना व संशोधकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. विविध विद्यापीठे, संशोधन संस्था व उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ संसाधन व्यक्ती या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर व प्रा. लक्ष्मीकांत दामा यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांचे सहकार्य लाभत आहे. प्रा. सिद्धाराम चौगुले व प्रा. महेश कंदी हे समन्वयक म्हणून काम पाहात आहेत.
सोलापूर शहरासह जिल्ह्यातील बारावी, पदवी व पदव्युत्तर उत्तीर्ण विद्यार्थी, संशोधक व जिज्ञासू विद्यार्थ्यांनी या ब्रीज कोर्समध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन करिअर मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
---
कोट :
KRK26B03820
पर्यावरणशास्त्र, भूगर्भशास्त्र आणि जिओइन्फॉरमॅटिक्स ही क्षेत्रे संशोधन, उद्योग व शाश्वत विकासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहेत. या ब्रीज कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्ये व भविष्यातील करिअर संधींबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.
- डॉ. विनायक धुळप, संचालक, भूशास्त्र संकुल