पुणे : कोरोनाचे सावट दूर होत असताना दिवाळीच्या निमित्ताने पुणेकर रसिकांनी भक्तिगीतांसह शास्त्रीय संगीताचा मनमुराद आनंद लुटला. ‘दीपसूर तेजाळती’ या दिवाळी पहाट कार्यक्रमात शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी आपल्या सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी सादर केलेल्या रचनांना श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.
‘सकाळ माध्यम समूहातर्फे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडलेल्या या सोहळ्यास रसिक पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, पुणे महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर, काँग्रेसचे गटनेते आबा बागूल, ‘रोटरी’च्या नियोजित डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मंजू फडके, बुलढाणा अर्बन कॉ-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, न्याती ग्रुपचे अध्यक्ष नितीन न्याती, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक डॉ. संजय चोरडिया, पू. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ, ‘तुणवाल ई-व्हेइकल इंडिया प्रा. लि.’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्रीयाळ माधवराव ठाकरे, पुण्यभूषण फाउंडेशन आणि त्रिदलचे संस्थापक डॉ. सतीश देसाई, ‘सकाळ’चे मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर या वेळी उपस्थित होते.
त्रिदल-पुणे पुण्यभूषण फाउंडेशचा या कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग होता, तर ‘पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स’ या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक होते. ‘न्याती ग्रुप’, बुलढाणा अर्बन कॉ-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’, ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’, ‘तुणवाल इ-व्हेइकल’ आणि ‘रोटरी’ या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते. ‘साम टीव्ही’ टेलिकास्ट पार्टनर होता. कार्यक्रमास प्रायोजक असलेल्यांचा फडणीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
देशपांडे यांना मिलिंद कुलकर्णी (हार्मोनिअम), रोहित मुजूमदार (तबला), रोहित कुलकर्णी (कीबोर्ड), सुजित लोहार (पखवाज), उद्धव कुंभार (तालवाद्य) यांच्यासह ऋषिकेश पाटील आणि नारायण खिल्लारी यांनी साथसंगत दिली. देशपांडे यांनी प्रथम ‘मै जाऊ जगा जगा’ आणि ‘रामकली रागा’तील दोन बंदिशी सादर केल्या. त्यांनी गायलेल्या ‘अलबेला सजन आयो रे’ला श्रोत्यांनी दाद दिली. त्यानंतर ‘कट्यार काळजात घुसली’मधील ‘तेजोनिधी लोहगोल’ या नाट्यपदानेही रसिक पुणेकरांची वाहवा मिळवली. ‘लक्ष्मी वल्लभा दिनानाथा’, ‘दिल की तपिश है आज आफताब’, ‘बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात’ या रचनांसोबत मैफल रंगत गेली, तर ‘कानडा राजा पंढरीचा’ ने कार्यक्रमाचा समारोप झाला. डॉ. सतीश देसाई यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची माहिती दिली. सूत्रसंचालन काका धर्मावत यांनी केले.
अखेर ती संधी आज मिळाली : देशपांडे
कोरोना काळात सर्वच केवळ ऑनलाइन सुरू होते. त्यामुळे कॅमेरा आणि हेडफोनची सवय लागली होती. मात्र त्या कार्यक्रमांद्वारे रसिकांमधून ऊर्जा मिळत नव्हती. कारण ते एकतर्फी होत होतं. आम्ही कलाकार कला सादर करण्यासाठी आसुसलेलो होतो. ती संधी आज मिळाली, अशी भावना देशपांडे यांनी कार्यक्रमादरम्यान व्यक्त केली.
सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान
सामाजिक कार्याबद्दल सिप्ला फाउंडेशन, बालग्राम, अन्नपूर्णा परिवार, डोअर स्टेप स्कूल आणि शेल्टर असोसिएट या संस्थांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते मानपत्र आणि काचेचा आकाशकंदील देऊन सन्मान करण्यात आला. तसेच पुण्यभूषण फाउंडेशनचे ज्येष्ठ सहकारी बाळासाहेब सातपुते यांनाही या वेळी गौरविण्यात आले.
"सकाळ’च्या माध्यमातून दिवाळीनिमित्त एक सुरेल पहाट ‘दीपसूर तेजाळती’मधून पुणेकरांना अनुभवता आली. हा कार्यक्रम नागरिकांना मोठा आनंद देणारा ठरला. यापेक्षा चांगली दिवाळीची सुरवात होऊ शकत नाही. कोरोनावर मात करत आपण एका द्यनव्या पर्वात प्रवेश करत आहोत. त्यासाठी असे कार्यक्रम आवश्यक आहेत. एका चांगल्या कार्यक्रमाला हातभार लावता आला, याचा आनंद आहे."
- सौरभ गाडगीळ, व्यवस्थापकीय संचालक, पू. ना. गाडगीळ ज्वेलर्स प्रा. लि.
"कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रम थांबले होते. त्यामुळे अशा प्रकारचे एकत्रीकरण व दीपावलीचा उत्साह वाढविणारा सोहळा आयोजित करणे गरजेचे होते. ते काम ‘सकाळ’ आणि ‘त्रिदल-पुणे पुण्यभूषण फाउंडेशन’ने केले. दिवाळी पहाटचे अतिशय सुंदर आयोजन केल्याबद्दल दोघांचेही अभिनंदन. आयोजक आणि प्रायोजक चांगले असल्याने दर्जेदार कार्यक्रमाची भेट पुणेकरांना मिळाली."
- शिरीष देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, बुलढाणा अर्बन कॉ. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी
"दिवाळी सणाची सुरवात चांगली व्हावी, यासाठी रसिक पुणेकर मोठ्या संख्येत भल्या पहाटे कार्यक्रमाला उपस्थित राहिले, हे पाहून बरे वाटले. नागरिकांचा उत्साह त्यातून दिसून येतो. राहुल देशपांडे यांच्या आवाजाने उपस्थितांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून बरे वाटले. एवढ्या नागरिकांच्या आनंदात या कार्यक्रमाच्या निमित्ताने भर पडली. त्याचे श्रेय ‘सकाळ’ आणि ‘त्रिदल-पुणे पुण्यभूषण फाउंडेशन’ला जाते. कारण असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मोठी मेहनत लागते."
- नितीन न्याती, अध्यक्ष, न्याती ग्रुप
"दिवाळी पहाटचा कार्यक्रम नागरिकांना मोठी ऊर्जा देणारा ठरला. कोरोना काळात रसिकांना मिळालेला हा एक चांगला अनुभव आहे. राहुल देशपांडे यांनी नागरिकांच्या दिवाळीची सुरवात प्रसन्न आणि मंगलदायी पद्धतीने करून दिली आहे. कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडत असताना पुणेकरांनी कार्यक्रमाला दिलेला प्रतिसाददेखील वाखाणण्याजोगा आहे."
- श्रीयाळ माधवराव ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक, तुणवाल ई-व्हेइकल इंडिया प्रा. लि.
"दिवाळी पहाटचा कार्यक्रम अतिशय हृदयस्पर्शी झाला. भक्तिमय सुरात मंगलमय दिवाळीची सुरवात यानिमित्ताने झाली आहे. बऱ्याच दिवसांनी झालेला असा कार्यक्रम अनेकांना ऊर्जा देणारा आहे. त्यामुळे नागरिकांचा आनंद द्विगुणित झाला आहे. गेल्या वर्षी न झालेल्या कार्यक्रमाची कसर आज भरून निघाली. सर्वांना भावेल असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल ‘त्रिदल-पुणे पुण्यभूषण फाउंडेशन’ आणि ‘सकाळ’चे अभिनंदन."
- डॉ. संजय चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.