पिंपरी, ता. ११ : पूर्वी एखाद्या व्यक्तीची लोकप्रियता त्याचे काम व जनसंपर्कातून स्पष्ट व्हायची. आता मात्र समाजात लोकप्रियता वाढावी, दबदबा निर्माण व्हावा व वेगळी छाप पाडण्यासाठी ‘वाट्टेल ते’ केले जात असल्याचे दिसते. त्या व्यक्तीच्या येण्या-जाण्यापासून त्याच्या सुरक्षेसाठी बाउन्सर उभे करण्यापर्यंत सर्व काही नियोजित असते.
एखादे उद्घाटन, वाढदिवस, लग्नकार्य अथवा इतर कार्यक्रम असो, एखाद्या व्यक्तीच्या आजूबाजूला बाउन्सरचा गराडा दिसून येतो. मोठेपणा दाखविण्यासह सोशल मीडियावर त्याचे प्रदर्शन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण वातावरणनिर्मितीसाठी आधीपासूनच नियोजन केले जात असल्याचेही दिसून येते.
ताफा दाखवण्यासाठी धडपड
महागड्या चारचाकी वाहनांचा ताफा घेऊन कार्यक्रमस्थळी पोहोचणे, वाहनांच्या ताफ्याचे व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर प्रसारित करणे, असा ट्रेंड वाढताना दिसत आहे. एखाद्या व्यक्तीचे आगमन अधिक प्रभावी दिसावे, यासाठी वाहनांची संख्या, त्यांचा क्रम आणि मार्ग याचेही नियोजन केले जाते.
आधीपासूनच तयारी
‘भाऊ’, ‘दादा’ यांचा समाजातील दबदबा दाखविण्यासाठी अथवा जनसंपर्क किती मोठा हे दाखविण्यासाठी आपल्या सोबतचे कार्यकर्ते अगोदरच त्या कार्यक्रमस्थळी पाठवले जातात. ‘भाऊं’ची गाडी त्या ठिकाणी पोहोचताच आयोजकांच्या अगोदरच ''ते'' कार्यकर्ते ‘भाऊं’च्या जवळ येतात. स्वागत व हस्तांदोलन करण्यासह कार्यक्रमाच्या मुख्य ठिकाणी नेण्याची व्यवस्था करतात. यामुळे ‘भाऊं’कडे इतर लोकांचे लक्ष वेधले जाते.
--------------------
उद्या ‘भाऊं’सोबत जायचे आहे. अमुक ठिकाणी सकाळी आठ वाजता उपस्थित राहा, असा निरोप आदल्या दिवशीच येतो. त्यानुसार तेथे उपस्थित राहून सकाळपासूनच भाऊंसोबतच्या गाडीत बसून फिरायचे. काही ठिकाणी ‘भाऊ’ पोहोचण्यापूर्वीच आपण उपस्थित राहायचे. तेथील वातावरण ‘भाऊंसोबतच्या’ आमच्या इतर कार्यकर्त्यांना कळवायचे. त्यानंतर ‘भाऊ’ तेथे पोहोचल्यावर त्यांचे स्वागत करायचे. दिवसभर ‘भाऊं’सोबत फिरण्याचे ठराविक मानधन दिले जाते.
- ‘भाऊं’सोबत मानधनावर फिरणारा एकजण
----------------
सध्या अनेक कार्यक्रमांत काही व्यक्तींभोवती बाउन्सरचा गराडा व वाहनांचा ताफा पाहायला मिळतो. रस्ता मोकळा करून देण्यासह संबंधित व्यक्तीची विशेष काळजी घेत असल्याचे दाखवित अधिक महत्त्व प्राप्त करून दिले जाते. हे मोठेपणा दाखविण्यासाठी असल्याचे दिसून येते.
- सुनील राजेभोसले, नागरिक, रहाटणी
-----------------
दृष्टिक्षेपात
- सोबत फिरणाऱ्यांना दिवसाचे मानधन - ८०० ते १००० रुपये
- बाउन्सरचे दिवसाचे मानधन - १५०० ते २००० रुपये
- किमान पाच-सहा कार्यकर्ते, चार बाउन्सर
- रील्स, सोशल मीडियावरील महिन्याचा खर्च - सुमारे २० ते २५ हजार
- वाहनांच्या ताफ्यावरील खर्च : एका वाहनाला दिवसाला १५०० ते २००० रुपये
- किमान चार वाहने
-----
इमेज
41856
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.