PNE26W54914 हिरज ः सीईओ कुशल जैन यांनी शनिवारी उत्तर सोलापूर तालुक्यात पाहणी दौरा केला. हिरज येथील प्राथमिक शाळेची पाहणी केली.
पाणीटंचाईसह विकासकामांचा सीईओंकडून आढावा
उत्तर सोलापूर तालुक्यात सेवा संकल्प अभियान; कुशल जैन यांचा पाहणी दौरा
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ३ ः ‘सेवा संकल्प अभियान’ प्रभावीपणे राबवित नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या उद्देशाने सीईओ कुशल जैन यांनी उत्तर सोलापूर तालुक्याचा पाहणी दौरा केला. पंचायत समिती येथे संयुक्त आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी हिरज, शिवणी व तिऱ्हे येथे भेटी देत पाणीटंचाई, आरोग्य, शिक्षण, जलजीवन मिशन, घरकुल, पोषण, जलसंवर्धन आणि ग्रामविकासाच्या विविध कामांचा आढावा घेतला.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून ‘प्रशासन गावाच्या दारी आणि सेवा नागरिकांच्या हक्काची’ अंमलबजावणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी आढावा घेतला. पंचायत समिती कार्यालयात तालुक्यातील पाणीटंचाईच्या आढावा घेण्यात आला. उपलब्ध पाणीस्रोत, संभाव्य टंचाईग्रस्त भाग तसेच अल्प व दीर्घकालीन उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. पाणीटंचाईच्या प्रश्नावर तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, तसेच विकासकामांना गती द्यावी, अशा सूचना सीईओ जैन यांनी दिल्या.
हिरजमध्ये नव्या घरकुलात गृहप्रवेश
हिरज ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या. हिरज येथे महिला आरोग्य तपासणी शिबिराची पाहणी केली. अंगणवाडीतील लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. पूर्ण झालेल्या घरकुलांचा गृहप्रवेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते णाला. सेवा संकल्प अभियानांतर्गत नागरिकांना जन्म, मृत्यू व विवाह नोंदणीचे दाखले वितरित करण्यात आले. शिवणी ग्रामपंचायतीला भेट दिली. येथे जल जीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून योजनेची प्रगती, पाणीपुरवठ्याची स्थिती व नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती घेतली.
तिऱ्हे आरोग्य केंद्रातील अडचणींची दखल
तिऱ्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यात आला. अपुऱ्या जागेमुळे आरोग्य सेवा देताना निर्माण होणाऱ्या अडचणींची माहिती घेऊन आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी गटविकास अधिकारी राजाराम भोंग, बाबासाहेब पाटील, विस्तार अधिकारी (पंचायत) सोमनाथ शिंदे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.