पुणे, ता. ६ : सीईटी परीक्षा केंद्राचे व्यवस्थापन करून विद्यार्थ्यांचे गुण वाढवून देण्याबाबतच्या कथित संभाषणाच्या ध्वनिफिताविरोधात महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) मुंबईतील आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली आहे. कथित संभाषण असणारी ध्वनिफीत आणि ध्वनिचित्रफीत संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरूनही हटविण्यात आली आहे.
सीईटी कक्षाकडे परीक्षेबाबत एका कथित ध्वनिफीत आणि ध्वनिचित्रफितीची तक्रार प्राप्त झाली होती. या ध्वनिचित्रफितीमधील संभाषणामध्ये एका महिलेने दूरध्वनीद्वारे एका पुरुषाशी संभाषण करताना आर्थिक मोबदला स्वीकारून एमएचटी-सीईटी परीक्षेसंदर्भात परीक्षा केंद्राचे व्यवस्थापन करणे, विद्यार्थ्यांची परीक्षा नियोजित पद्धतीने पार पाडणे तसेच संबंधित विद्यार्थ्याचे गुण वाढवून देण्याबाबत कथित आश्वासन दिल्याचे प्रथमदर्शनी संभाषणातून निदर्शनास आले. या संभाषणामध्ये आर्थिक व्यवहाराचा उल्लेख केलेला असून, अशाप्रकारे आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात परीक्षा केंद्राचे व्यवस्थापन करून विद्यार्थ्यास अनुचित लाभ मिळवून देण्याबाबत केलेले कथित विधाने गंभीर आणि आक्षेपार्ह आहे. अशा प्रकारच्या कथित गैरप्रकारामुळे एमएचटी-सीईटी परीक्षेच्या पारदर्शकतेवर, निष्पक्षतेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होण्यासाठी सीईटी कक्षाने कथित ध्वनिफितीची लेखी तक्रार पोलिसांकडे केली आहे, अशी माहिती सीईटी कक्षाने दिली आहे.
या प्रकरणासंदर्भात कोणत्याही बाधित विद्यार्थ्याकडून अथवा संबंधित व्यक्तीकडून सीईटी कक्षास अद्याप कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही. असे असले तरी, प्राप्त व्हिडिओमधील संभाषणाचे गांभीर्य लक्षात घेता, या संभाषणाची सत्यता पडताळणे, संबंधित व्यक्तींची ओळख निश्चित करणे, संभाषणाची पार्श्वभूमी तपासणे तसेच कथित गैरप्रकारामागील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पोलिसांत तक्रार केली आहे. संबंधित व्हिडिओची सत्यता पडताळून, आवश्यकतेनुसार तांत्रिक तपासणी करून, संबंधित व्यक्तींची चौकशी करावी आणि प्रचलित कायद्यातील तरतुदींनुसार योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, अशी विनंती सीईटी कक्षाने पोलिसांकडे केली आहे.
सोशल मिडियावरील पोस्ट हटविल्या
सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून चुकीची माहिती, दिशाभूल करणारी, अपूर्ण, असत्य माहिती प्रसारित केली जात असल्याचे सीईटी कक्षाच्या निदर्शनास आले आहे. या माहितीची पडताळणी करून आवश्यकतेनुसार कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी एका टास्क फोर्स स्थापना सीईटी कक्षाने केली आहे. या टास्क फोर्सने दोन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला कायदेशीर नोटिस पाठविली आहे. या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने आपल्या पोस्ट तातडीने हटविल्या आहेत.
........
तक्रारी पाठविण्याचे आवाहन
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सीईटी कक्षाच्या कामकाजाबाबत चुकीची माहिती प्रसारित केल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यावरून सीईटी कक्षाने एक स्वतंत्र ईमेल आयडी तयार केला आहे. कक्षाकडे येणाऱ्या तक्रारींची शहानिशा करून, त्या तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. तरी, विद्यार्थी-पालकांनी सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून चुकीची माहिती, दिशाभूल करणारी, अपूर्ण, असत्य माहिती आढळल्यास ती माहिती ‘socialmedia.complaints@mahacet.org’ या ईमेलवर पाठविण्यात यावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.