चाकण, ता. १३ : चाकण औद्योगिक वसाहतीत अतिक्रमणांचे पेव फुटले असून, काही व्यावसायिक भाड्याने जागा देऊन लाखो रुपये कमावत आहेत. एमआयडीसीने कारवाई करूनही परिस्थिती ''जैसे थे'' असल्याने नागरिक, कामगार आणि उद्योजकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आता प्रशासनाने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिला आहे.
येथील महाळुंगे, खालुंब्रे, वराळे, शिंदेगाव, वासुली, भांबोली, सावरदरी आणि निघोजे या गावांच्या परिसरात रस्त्यालगत हॉटेल, पत्र्याची शेड आणि इतर व्यावसायिक अतिक्रमणांनी वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. काही लोकांनी या अतिक्रमणांचा धंदाच सुरू केला असून, जागा बळकावून त्या भाड्याने देऊन लाखो रुपये कमावत असल्याचे चित्र आहे.
मागील महिन्यात एमआयडीसीने या भागातील अतिक्रमणांवर कारवाई केली होती; मात्र तरीही अनेक अतिक्रमणे शिल्लक राहिली आहेत किंवा पुन्हा नव्याने उभी राहत आहेत. हे एक भयानक वास्तव असून, एमआयडीसीने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. प्रशासनाने नुकतीच भांबोली, वासुली, शिंदे, वराळे, सावरदरी, खालुंब्रे आणि निघोजे येथील रस्त्यांवरील छोटी-मोठी अतिक्रमणे काढली. मात्र, या कारवाईनंतरही काही ठिकाणी पुन्हा अतिक्रमणे होत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
रस्त्यालगत अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी पोलिसांच्या मदतीने एमआयडीसी गस्त पथक तयार करणार आहे. हे पथक दर आठवड्याला प्रमुख रस्त्यांवर पाहणी करून निदर्शनास आलेल्या अतिक्रमणांवर थेट कारवाई करेल. कोणीही रस्त्यालगत अतिक्रमणे करू नयेत.
- प्रकाश भडंगे, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी
महत्त्वाचे मुद्दे
भांबोलीसह इतर प्रमुख चौकांतील अतिक्रमणे हटवून त्यांचे रुंदीकरण केले जाणार आहे.
रस्त्यालगतची अतिक्रमणे काढलेल्या मोकळ्या जागी रस्ते रुंद केले जाणार नाहीत.
काही नेते व कार्यकर्ते दादागिरी करून अतिक्रमण करत असून, त्यांच्यावर प्रथम कारवाई व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
अतिक्रमणे काढल्यानंतरही पुन्हा त्याच जागी अतिक्रमणे होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.