चाकण, ता. २० : चाकण आणि परिसरातील औद्योगिक वसाहतीत कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. स्थानिक रहिवासी, उद्योग, कंपन्यांचा फटका बसत आहे. औद्योगिक वसाहतीत निर्माण होणारा घनकचरा, रासायनिक कचरा, प्लास्टिक कचरा आणि इतर कचऱ्याचे नियोजन न झाल्याने तसेच विविध गावातील कचरा अगदी मुख्यमार्गावर पुणे नाशिक महामार्गावर, चाकण तळेगाव ,चाकण शिक्रापूर मार्गावर टाकला जातो. त्यामुळे कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणात दिसतात. कचऱ्यामुळे पर्यावरण आणि आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या चाकण औद्योगिक वसाहतीत लघु आणि मोठे उद्योग आहेत. वाहननिर्मिती, अभियांत्रिकी व इतर क्षेत्रांतील उद्योग, कंपन्यां मधून दररोज हजारो टन औद्योगिक कचरा निर्माण होतो. मात्र, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा अपुरी पडत आहे. पावसाळ्यात हा कचरा ओढ्या, नाल्यांत मिसळून पाणीप्रदूषण वाढत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरते डासांचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे कचरा उचलण्याची व्यवस्था अधिक सक्षम करणे गरजेचे आहे.
प्रकल्प प्रलंबितच
चाकण औद्योगिक वसाहतीत एमआयडीसी ने कचरा प्रकल्प उभारण्यासाठी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजला जागा दिलेली आहे. तेथे कचरा प्रकल्प होणार आहे, परंतु तो अजूनही प्रलंबित आहे. त्यामुळे हा कचरा प्रकल्प केव्हा सुरू होणार याकडे उद्योजक, कंपन्यांचे लक्ष लागलेले आहे.
औद्योगिक वसाहतीत फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजला सात एकर जागा दिलेली आहे. या जागेत सुमारे साडेनऊ कोटींचा कचरा प्रकल्प होणार आहे. औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांतील कचरा येथे संकलित केला जाणार आहे. त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. हा कचरा प्रकल्प येत्या ऑगस्टपर्यंत कार्यान्वित होईल सध्या काम सुरू आहे.
- प्रकाश भडंगे, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी