कुरुळी/चाकण, ता. २५ : चाकण औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक एक व चारमधील रस्त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत एमआयडीसीमध्ये सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांना वेग आला आहे. ठीक ठिकाणी सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मागील काळातील असलेल्या दुरवस्था झालेल्या रस्त्यांच्या तुलनेत यावर्षी चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांची परिस्थिती निश्चितच सुधारलेली दिसून येत आहे. यामुळे नागरिकांची खड्डेमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑगस्ट २०२५ मध्ये चाकण एमआयडीसी परिसराचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी चाकण एमआयडीसीमधील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत तत्कालीन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर सामंत यांनी तत्परतेने एमआयडीसीमधील प्रमुख रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याबाबत निर्णय घेऊन मुख्य रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली.
प्रमुख रस्त्यांची कामे पूर्णत्वास
एमआयडीसीच्या संबंधित अधिकारी व यंत्रणेने दिलेल्या कालमर्यादेत चाकण औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक एक व चार मधील जवळपास बारा किलोमीटर लांबीच्या प्रमुख रस्त्यांची कामे पूर्णत्वास नेली आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था तसेच रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्यास मोठी मदत झाली आहे.
सध्या इंदूरन्स चौकातील रस्त्याचे काम वाहतुकीच्या मोठ्या प्रमाणामुळे काही प्रमाणात संथ गतीने सुरू आहे. या ठिकाणी सायंकाळच्या वेळेत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. सदर ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक विभागाकडून ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली असून, कामाला गती देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. हे कामही लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
चाकण एमआयडीसीमधील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रीटीकरण ज्या पद्धतीने करण्यात आले आहे, त्याच धर्तीवर चाकण औद्योगिक क्षेत्राला जोडणाऱ्या बाहेरील प्रमुख रस्त्यांकडेही संबंधित विभागांनी तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. विशेषतः तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता, पुणे-नाशिक महामार्ग, निघोजे -कुरुळी मार्ग, चिखली-मोई मार्ग, खालुंब्रे - ह्युंदाई कारखाना मार्ग पीडब्लयूडी, पीएमआरडीए व एमएसआरडीसीच्या अखत्यारीतील प्रमुख व अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण, दुरुस्ती आणि खड्डे बुजविण्याची कामे वेळेत होणे गरजेचे आहे.
मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन
उद्योग मंत्री यांनी या सर्व कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्यामुळे ही कामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे एमआयडीसी प्रशासनाचे नियोजन आहे. चाकण एमआयडीसी क्षेत्रातील सर्व मुख्य रस्ते एमआयडीसीकडून विकसित केले जात आहेत. स्थानिक रहिवासी, कामगार व उद्योजकांकडून एमआयडीसी च्या कामाबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खड्डेदुरूस्ती करीता जियो पॉलिमर या अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना १६ ऑगस्ट च्या बैठकीत देण्यात आल्या होत्या.
‘प्रमुख चौकांचे रुंदीकरण करा’
चाकण एमआयडीसी मध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर उद्योजक, कामगार, मालवाहतूक वाहने व नागरिकांची ये-जा होत असते. त्यामुळे या जोडरस्त्यांवरील वाहतूक कोंडी व खड्ड्यांचा त्रास कमी करण्यासाठी संबंधित विभागांनी रस्त्यांवरील तसेच ओढे व नाल्यांवरील अतिक्रमणे तातडीने हटवून रस्ते व प्रमुख चौकांचे रुंदीकरण करावे, अशी मागणी होत आहे.
दृष्टिक्षेपातील काही रस्ते
- एचपी चौक ते हंडस्मन चौक या मुख्य रस्त्याचे काम सुरू
- टप्पा ३ येथील स्कोडा कंपनी ते स्पायसर चौक या रस्त्याचे काम सुरू
- महिंद्रा चौक ते स्कोडा कंपनी येथील काम ८० टक्के पूर्ण
02509
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.