चाकण, ता. १ : चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्ते दुरुस्तीची ३१ ऑगस्टची मुदत उलटूनही खड्डे ‘जैसे थे’ आहेत. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आणि ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे वाहनचालक, कामगार व नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, जीवघेण्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे. प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चाकण औद्योगिक परिसरातील प्रमुख रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. सततच्या पावसामुळे खड्ड्यांचा आकार आणि संख्या वाढतच असून, वाहनचालकांना रोज जीवघेणी कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खोलीचा अंदाज येत नाही, ज्यामुळे लहान-मोठे अपघात नित्याचे झाले आहेत. चाकण औद्योगिक वसाहतीकडे ये-जा करणाऱ्या रस्त्यांवर अवजड वाहने, मालवाहतूक करणारे ट्रक आणि दुचाकीस्वारांची मोठी वर्दळ असते. सकाळी आणि सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. काही ठिकाणी तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली असली, तरी पहिल्याच पावसात ती उखडून गेल्याने कामाच्या दर्जावरच संशय व्यक्त होत आहे. प्रशासनाने केवळ डेडलाइन न देता रस्त्यांची दर्जेदार दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता प्रशासन या समस्येवर कधी तोडगा काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मंत्र्यांच्या दौऱ्यापुरतीच मलमपट्टी?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्यावेळी तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्यात आले होते. यासाठी प्रीकास्ट पॅनल आणि जिओ-पॉलिमरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला. मात्र, हा केवळ दिखावा होता का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. कारण दौऱ्यानंतर रस्त्याची अवस्था पुन्हा बिकट झाली आहे.
रस्ते दुरुस्तीसाठी तब्बल ५९ कोटी रुपयांचा निधी मंजूर असतानाही काम का होत नाही? संबंधित ठेकेदार कंपनी कामच करत नाही. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे.
- अमोल पवार, माजी उपसभापती
प्रमुख मुद्दे :
खड्डे बुजवण्यासाठी दिलेली ३१ ऑगस्टची मुदत उलटली.
खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरू, जीवितहानीचा धोका.
दुरुस्तीची झालेली कामे अत्यंत निकृष्ट आणि तकलादू दर्जाची.
निष्क्रिय प्रशासन आणि दोषी ठेकेदारांवर कारवाईची मागणी.
CHN26B11166