आंबेठाण, ता. २ : चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाचे पर्यायी रस्ते प्रलंबित असताना, प्रशासनाने थेट गावठाणातील रस्ते रुंद करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. या एकतर्फी निर्णयामुळे महाळुंगे, आंबेठाण, वासुली येथील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून, ''प्रशासकीय दिरंगाईचा भुर्दंड आम्ही का सोसावा?'' असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
जागतिक ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकण औद्योगिक पट्ट्यातून शासनाच्या तिजोरीत कोट्यवधींचा महसूल जमा होत असला, तरी विकासाचा हाच वेग आता स्थानिकांसाठी कर्दनकाळ ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) यापूर्वीच महाळुंगे इंगळे, आंबेठाण, बिरदवडी, वासुली, भांबोली या गावांमध्ये हजारो एकर जमीन संपादित केल्याने स्थानिकांच्या जमिनी एकरांऐवजी गुंठ्यांवर आल्या आहेत.
एकीकडे चाकण-तळेगाव मुख्य रस्ता आणि तळेगाव ते चाकण एमआयडीसीला जोडणारा ७५ मीटरचा प्रस्तावित रस्ता अनेक वर्षांपासून रखडला आहे. या मोठ्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्याऐवजी प्रशासनाने आपला मोर्चा थेट गावठाणांकडे वळवला आहे. गावातील अरुंद रस्ते १२ मीटर रुंद करण्यासाठी ग्रामस्थांना नोटिसा बजावल्याने स्थानिकांचा संताप अनावर झाला आहे. या रुंदीकरणात अनेकांची घरे, दुकाने आणि व्यवसायाची ठिकाणे बाधित होणार आहेत. आधीच शेतजमिनी गमावल्याने रोजगाराचा प्रश्न गंभीर असताना, आता गावठाणातील जागाही जाणार असेल, तर जगायचे कसे? असा उद्विग्न सवाल ग्रामस्थ करत आहेत.
ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
प्रशासनाच्या या नियोजनशून्य कारभाराविरोधात नागरिक एकवटले असून, आधी पर्यायी रस्त्यांची कामे पूर्ण करा आणि त्यानंतरच गावठाणातील रस्त्यांबाबत स्थानिकांशी चर्चा करून निर्णय घ्या, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
या आहेत प्रमुख मागण्या
प्रलंबित तळेगाव-चाकण ७५ मीटर रस्त्याचे काम सर्वप्रथम पूर्ण करा.
रुंदीकरणापूर्वी बाधित होणारी घरे आणि दुकानांचे सर्वेक्षण करा.
स्थानिकांशी चर्चा करूनच निर्णय घ्या; एकतर्फी नोटिसा रद्द करा.
बाधितांना योग्य मोबदला आणि पुनर्वसनाची ठोस हमी द्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.