चाकण, ता. २७ : चाकण औद्योगिक वसाहतीमधील जीवघेण्या वाहतूक कोंडीने नागरिक, कामगार आणि उद्योजक अक्षरशः नरकयातना भोगत आहेत. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी बाह्यवळण मार्गासह नवीन रस्त्यांची कामे तातडीने सुरू करण्याची आक्रमक मागणी बाधित शेतकऱ्यांनी बुधवारी (ता. २६) सायंकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यांनी ठोस उपाययोजनेचे आश्वासन दिले आहे.
चाकण शहर आणि औद्योगिक परिसरातील वाहतुकीचा प्रश्न आता हाताबाहेर गेला आहे. पुणे-नाशिक महामार्ग, तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्ग आणि आंबेठाणकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दररोज दीड लाखाहून अधिक वाहने धावत असल्याने हे रस्ते मृत्यूचे सापळे बनले आहेत. अवजड वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीचा अक्षरशः चक्का जाम होतो. या गंभीर कोंडीमुळे सातत्याने होणारे अपघात, त्यात जाणारे निष्पाप बळी, रुग्णवाहिकांनाही वाट न मिळण्याची भीषण परिस्थिती आणि कामावर जाणाऱ्या कामगार-विद्यार्थ्यांचे वाया जाणारे तास यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी शहराबाहेरून जाणारी अवजड आणि लांब पल्ल्याची वाहतूक बाह्यवळण मार्गावरून वळवणे हा एकमेव पर्याय शिल्लक राहिला आहे. याशिवाय, पीएमआरडीएच्या दुर्लक्षामुळे ग्रामीण भागाला जोडणाऱ्या अनेक रस्त्यांची चाळण झाली असून, काही ठिकाणी नवीन रस्त्यांची नितांत गरज आहे.
या सर्व समस्यांचा पाढाच बाधित शेतकरी सुनील कड आणि मनोज खांडेभराड यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर वाचला. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते. प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करून तातडीने निधी उपलब्ध करावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
अजितदादांचे स्वप्न पूर्ण करणार
‘‘चाकणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. वर्षभरापूर्वी स्व. अजितदादा पवार यांनी स्वतः पाहणी करून तळेगाव आणि आंबेठाण चौक मोठे केले होते. त्यांचेच काम पुढे नेत मी शॉर्ट टर्ममध्ये अतिक्रमणे काढून चौक मोठे करणार आहे, तर लाँग टर्ममध्ये तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्ग आणि पुणे-नाशिक महामार्गाची नव्याने कामे हाती घेतली जातील. यासाठी जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे. चाकणला कोंडीमुक्त करण्याचे अजितदादांचे स्वप्न मी पूर्ण करणारच.’’
उद्योजक स्थलांतर करणार नाहीत
मी उद्योजकांच्या समस्या वेळोवेळी समजून घेतल्या आहेत, त्यांच्यासोबत बैठकाही झाल्या आहेत. वाहतूक कोंडी आणि इतर प्रश्न तातडीने सोडवले जातील, त्यामुळे एकही उद्योजक स्थलांतर करणार नाही. मी स्वतः लवकरच चाकणला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करणार आहे.
महत्त्वाचे मुद्दे
शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी बाह्यवळण मार्गाची निर्मिती करणे अत्यावश्यक.
अवजड आणि लांब पल्ल्याची वाहतूक शहराबाहेरून वळवून अपघातांचे प्रमाण रोखणे.
औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी नवीन रस्त्यांचे जाळे निर्माण करणे.
एमआयडीसीमार्फत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांना गती देऊन ते लवकर पूर्ण करणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.