गणेश बोरुडे : सकाळ वृत्तसेवा
तळेगाव स्टेशन, ता. १४ : ‘‘चाकण औद्योगिक क्षेत्रातील स्थानिक उद्योजकांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला शासनाला वेळ नाही का?’’ असा सवाल वाहतूक कोंडीत श्वास घुसमटलेले उद्योजक विचारत आहेत. चाकण क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ‘एमआयडीसी’, ‘पीएमआरडीए’, सार्वजनिक बांधकाम विभाग, ‘एमएसआयडीसी’ आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने एकत्रितपणे चाकणला जोडणाऱ्या रस्ते विकासाचा कृती आराखडा तयार करावा, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची मागणी हे त्रस्त उद्योजक करत आहेत.
चाकण ‘एमआयडीसी’ सर्वत्र खड्डे, खाचखळगे, रस्त्यांची दर्जाहीन कामे, रस्त्यावर वाहणारे अथवा तुंबलेले सांडपाणी, विनापरवाना खोदाईमुळे रस्त्यांची चाळण दिसते. चोरी-छुपे अवजड वाहतूक सुरूच असते. ठिकठिकाणी फुटलेले दुभाजक. पथदिव्यांच्या खांबांवर अनधिकृत केबलचे जाळे यापासून बचाव करत उद्योजक, कामगार, कर्मचाऱ्यांसह वाहनचालकांना अडथळ्यांची शर्यत ओलांडावी लागते. रस्त्यांचे आयुष्य वाढावे आणि देखभाल खर्च वाचावा म्हणून ‘एमआयडीसी’ प्रशासनाने कथित आधुनिक तंत्रज्ञानाने नुकत्याच तयार केलेल्या टप्पा क्रमांक २ मधील किंग्फा कंपनी ते कॉर्निंग-कोरेगाव फाटापर्यंतच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या पृष्ठभागावर झीज व्हायला सुरुवात झाली आहे. उर्वरित डांबरी रस्त्यांची दुरवस्था पाहवत नाही. चिंचवड अथवा वाकडेवाडीला बसून ‘रिमोट’ कारभार पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना कामाचा दर्जा तपासण्यासाठी वेळ नसल्याने रस्त्यांची दुरवस्था वाढतच आहे, असा आरोप उद्योजक करत आहेत.
औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्ते ‘एमआयडीसी’ने विकसित केले आहेत. त्या भागाला जोडणाऱ्या जिल्हा परिषद, पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग, सा. बां. विभाग आणि ‘एमएसआयडीसी’च्या अखत्यारितील रस्त्यांबाबत वर्षानुवर्षे निधीच्या घोषणा आणि निविदांचा फार्स केला जातो. अंतर्गत रस्ते काहीसे मोकळे असले, तरी जोडरस्त्यांवर नेहमीच कोंडी असते. ती सोडवण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती, तळेगाव-चाकण उन्नत महामार्गासह ‘पीएमआरडीए’ आराखड्यातील नियोजित जोडरस्त्यांची कामे वेगाने होणे गरजेचे आहे. मुख्य रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंगला आळा घालावा लागणार आहे. मालवाहतूक करणारे चालक, बसचालक आणि कामगार, कर्मचाऱ्यांना शिस्त लावणे गरजेचे आहे. तरच कोंडी कमी होईल.
उन्नत मार्गाचे काम सुरू व्हावे
चाकण औद्योगिक क्षेत्रातून जाणारा तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग मुळातच अरुंद आहे. या उन्नत महामार्गाचे काम होण्यापूर्वी सद्यःस्थितीत रस्त्याच्या रुंदीकरणासह दुरुस्तीसाठी काढलेल्या ५९ कोटी रुपयांचा कार्यादेश निघून सहा महिने उलटूनही ठोस कामे दिसत नाहीत. कार्यस्थळ सोडून पुण्यात आभासी भूमिपूजन झालेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत महामार्ग कामाचा नारळ तर फुटला, मात्र कुदळ कुठेही पडलेली नाही. या कामाला किमान दोन-तीन वर्षे तरी लागतील. तोपर्यंत सध्याच्या रस्त्याचे डांबरीकरणासह रुंदीकरण गरजेचे आहे.
‘पीएमआरडीए’चा रस्ते विकास आराखडा कागदावरच
चाकण औद्योगिक क्षेत्राला जोडणाऱ्या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत सर्वाधिक रोष सध्या ‘पीएमआरडीए’ प्रशासनाच्या नावानेच ऐकायला मिळतो. ‘‘प्रशासनाचे आराखडे हे विकासासाठी नसून फक्त धनिकांच्या सोयीनुसार बदलण्यासाठी आहेत का?’’ असा सवाल स्थानिक विचारत आहेत. रिंगरोडच्या एका कामावर पायाभूत सुविधांचा ढोल वाजवणाऱ्या ‘पीएमआरडीए’ला औद्योगिक क्षेत्राला पूरक रस्त्यांना वर्षानुवर्षे प्रत्यक्षात उतरवता आलेले नाही.
कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम
कामावर जाताना आणि घरी परतताना कर्मचाऱ्यांची ऊर्जा खर्ची पडते. त्याचा परिणाम कार्यक्षमता आणि पर्यायाने उत्पादनावर होतो आहे. नेमणुकीवेळी ‘कामाचे ठिकाण’ म्हणून चाकणचे नाव घेतले तर कामगार, कर्मचारी आता ‘नको’ म्हणत आहेत. तसेच औद्योगिक क्षेत्रात उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल तसेच उत्पादित होऊन ग्राहकांकडे जाणारा पक्का माल कोंडीत अडकून पडतो. पुरवठा साखळी विस्कळित होते. तयार माल ग्राहक कंपनीला वेळेत पोहोचत नसल्याने त्यांनी चाकण सोडून इतर पुरवठादार शोधणे सुरू केले आहे.
पाच खात्यांकडून रस्त्यांचा विकास आवश्यक
१) महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) : तळेगाव-चाकण उन्नत महामार्ग (एनएच ५४८-डी)
२) राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण : नाशिक फाटा ते खेड रस्ता
३) पीएमआरडीए : बिरदवडी ते वाकी फाटा रस्ता, निघोजे ते कुरुळी रस्ता, येलवाडी ते देहू रस्ता, कडाचीवाडी ते मेदनकरवाडी (बंगला वस्ती) बाह्यवळण रस्ता, नवीन गाथा मंदिर-देहू ते खालुंब्रे रस्ता (नवीन)
४) एमआयडीसी : काँर्निंग ते वाकी फाटा टप्पा क्रमांक ५, तळेगाव एमआयडीसी टप्पा १ ते २ जोडरस्ता, सर्व टप्प्यांतील अंतर्गत रस्ते दुरुस्ती
५) सा. बां. विभाग : खालुंब्रे ते ह्युंडाई कंपनी रस्ता, सावरदरी ते सुदुंबरे रस्ता, भंडारा डोंगर ते सुदुंबरे रस्ता, मिंडेवाडी ते जांबवडे रस्ता
‘एमआयडीसी’कडून टप्पा क्र. २ कॉर्निंग कंपनी ते वाकीदरम्यान अडीच किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित ४ किलोमीटर काम प्रगतिपथावर आहे. सात-आठ महिन्यांत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. नाशिक महामार्गाला जोडणारा ७०० मीटरचा टप्पा ‘पीएमआरडीए’ विकसित करणार आहे. ‘एमआयडीसी’तील सिमेंट काँक्रिटच्या नवीन तयार होणाऱ्या रस्त्यांचा ‘डीएलपी’ (दोष दायित्व कालावधी) पाच वर्षांचा आहे. इतर रस्त्यांची दुरुस्ती सुरू आहे. तळेगाव-चाकण मार्गावरील रहदारी एकेरी वाहतुकीद्वारे ‘एमआयडीसी’मधून वळवल्याने एन्ड्युरन्स ते एचपी चौक रस्त्यावर वाहतूक कोंडी होते.
- प्रकाश भडंगे, कार्यकारी अभियंता, चाकण एमआयडीसी
कार्यालय आकुर्डीमध्ये असले, तरी आमचे ग्राहक हे सावरदरी, चाकण, तळेगाव एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रात आहेत. त्यामुळे ग्राहक कंपन्यांना सेवा देण्यासाठी जाताना रोजच वाहतूक कोंडीत अडकावे लागते. चाकण परिसरातील रस्त्यांची दुरवस्था पावसाळ्यापुरतीच नव्हे, तर बाराही महिने असते. दरमहा साधारणत: सरासरी १६ हजार कोटींचा ‘जीएसटी’ भरणाऱ्या उद्योजकांना सरकार काय सुविधा देते, यावर आत्मचिंतन गरजेचे आहे.
- नारायण बडवे, उद्योजक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.