पुणे

मध्य प्रदेशात चित्त्यांना मिळणार नवे घर

CD

भोपाळ, ता. ६ (पीटीआय)ः देशातून नामशेष झालेल्या चित्त्यांचे पुन्हा संवर्धन करण्याच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यान आणि गांधी सागर वन्यजीव अभयारण्यानंतर याच राज्यात बुंदेलखंड विभागात असलेल्या वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्पातही या महत्त्वाच्या प्रकल्पाचा विस्तार करण्यात येत आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हस्ते या व्याघ्र प्रकल्पात ‘थोलो’ या नर चित्त्याला व ‘सीसीबी-३’ या मादी चित्त्याला सोडण्यात आले.
वन्यजीव संवर्धन सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी मुख्यमंत्री यादव यांच्या हस्ते वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्पात दोन चित्त्यांना सोडल्याने वन्यजीव संवर्धनात ऐतिहासिक अध्याय लिहिला गेला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात चित्त्यांना तिसरा अधिवास उपलब्ध झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या व्याघ्र प्रकल्पात चित्यांच्या संरक्षणासाठी व त्यांना नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यात मदत करण्यासाठी ४३९ एकरवर विशेष सुविधा करण्यात आल्या आहेत. आधुनिक कुंपणे (बोमा) आणि इतर सुविधांनी सज्ज असे सुरक्षित अधिवास क्षेत्र तयार करण्यात आले आहे. वन विभागाकडून चित्त्यांची नियमित देखभाल, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. या प्रकल्पात चित्ते आल्याने सागर व बुंदेलखंड विभागात वन्यजीव पर्यटनाला चालना मिळेल तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल, असा अधिकाऱ्यांचा विश्वास आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १७ सप्टेंबर २०२२ रोजी नामिबियाहून आणलेले चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडून चित्ता पुनर्वसन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतूनही भारतात चित्ते आणण्यात आले. आता मध्य प्रदेशातील अनुकूल वातावरण असलेल्या जंगलात या प्रकल्पाचा विस्तार केला जात आहे.


दुर्गावती व्याघ्र प्रकल्पाची वैशिष्ट्ये
नौरादेही व्याघ्र प्रकल्पाच्या नावानेही ओळखला जाणारा हा व्याघ्रप्रकल्प मध्य प्रदेशातील तिसऱ्या क्रमांकाचा वाघांचा सर्वांत मोठा अधिवास समजला जातो. राज्यातील सागर, दामोह आणि नरसिंहपूर या तीन जिल्ह्यांत सुमारे २,३३९ चौरस फुटांवर हा प्रकल्प पसरला आहे. नौरादेही वन्यजीव अभयारण्यात विलीन झाल्यानंतर १९९७ मध्ये स्थापन झालेल्या या प्रकल्पात २० सप्टेंबर २०२३ रोजी व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला होता. या प्रकल्पात वाघांसह, बिबटे, चितळ, सांबार, नीलगाय, अस्वले आढळतात. धोक्यात आलेल्या भारतीय गिधाडांचेही संवर्धन केले जाते.

देशातील चित्त्यांची संख्या
६०
भारतात जन्मलेले चित्ते
४१

रशियातील लॅब टेक्निशियनच्या मृत्यूने खळबळ; न्यूमोनिक प्लेगची चर्चा, भारताची चिंता वाढली?

Sangli Mother Child Death : सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना! आई-बाळाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू

Strait of Hormuz Attack : होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; ११ भारतीय खलाशी जखमी

Satej Patil Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या बिनविरोधसाठी सतेज पाटलांना ४ जागा?, बंटी पाटलांनी हसत हसत कंडका पाडला

Kalamb Crime : पवनचक्की तार चोरीचा पर्दाफाश; पाच जणांना अटक, ११ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT