चिकमहूद परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ
वृद्धेच्या गळ्याला चाकू लावून मंगळसूत्र लुटले; बंद घरातून दागिने, रोकड लंपास
सकाळ वृत्तसेवा
महूद, ता. ३ : चिकमहूद (ता. सांगोला) परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. वृद्ध महिलेच्या गळ्याला चाकू लावून दोन तोळ्यांचे मंगळसूत्र लुटण्यासह बंद घराचे कुलूप तोडून साडेतीन तोळ्यांचे दागिने आणि २० हजार रुपये चोरून नेल्याच्या घटना रविवारी (ता. १) घडल्या. याशिवाय पालात राहणाऱ्या एका कुटुंबाच्या पालाला आग लावून ६० हजार रुपये चोरल्याची घटनाही समोर आली आहे. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
चिकमहूद येथील सेवानिवृत्त मंडलाधिकारी सदाशिव भोसले हे कामानिमित्त गावात गेले होते. त्यांची पत्नी सिंधूताई भोसले या भोसलेवस्ती येथील घरी एकट्याच होत्या. रविवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास दबा धरून बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्याला चाकू लावून सुमारे दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले.
दुसऱ्या घटनेत चिकमहूद- दिघंची रस्त्यालगत राहणारे प्रकाश कुंडलिक भोसले यांच्या घरातील सर्वजण रविवारी दुपारी शेतात गेले होते. ही संधी साधून चोरट्याने दुपारी तीनच्या सुमारास घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. लोखंडी कपाटातील सोन्याची कर्णफुले, झुबे, गंठण असे सुमारे साडेतीन तोळ्यांचे दागिने आणि २० हजार रुपयांची रोकड चोरून नेली.
परिसरात यापूर्वीही चोरीच्या घटना घडल्या असून, त्यांचा तपास लागला नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या घटनांबाबत सांगोला पोलिस ठाण्यात अद्याप तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती आहे.
---
चौकट
पालाला लावलेल्या आगीत
संसारोपयोगी साहित्य खाक
महूद-अकलूज रस्त्यालगत पाल टाकून राहणारे यल्लाप्पा दुर्गाप्पा वाघमोडे यांचे कुटुंब भंगार गोळा करून उदरनिर्वाह करते. यात्रेनिमित्त हे कुटुंब सोमवारी विजयवाडी येथे गेले असताना रात्री साडेअकराच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या पालात प्रवेश केला. व्यवसायासाठी डब्यात ठेवलेली ६० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्यानंतर पालाला आग लावली. या आगीत ज्वारी, बाजरी, गहू, तेलासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. दिवाळीच्या तोंडावर निवारा आणि जमापुंजी गमावल्याने वाघमोडे कुटुंबावर संकट कोसळले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.