चिनी वैमानिकांचा
राफेलबरोबर सराव
इजिप्तमध्ये साधली दुर्मिळ संधी
कैरो, ता. २५ (वृत्तसंस्था) : इजिप्तमध्ये नुकत्याच झालेल्या संयुक्त युद्धसरावामध्ये चीनचाही सहभागी झाला. या युद्धसरावात चीनच्या जे-१६ लढाऊ विमानांनी प्रथमच इजिप्तच्या ताफ्यातील फ्रेंच बनावटीच्या राफेल विमानांबरोबर आभासी पद्धतीने सराव केला. भारतीय हवाई दलाकडे राफेल विमाने असून, प्रथमच चीनला या विमानांबरोबर एकत्रित सराव करण्याची संधी मिळाली.
इजिप्तमध्ये चीन-इजिप्त ‘ईगल्स ऑफ सिव्हिलायजेशन’ हा युद्धसराव झाला. यात चीनच्या हवाई दलाकडून जे-१६ आणि इजिप्तची राफेल विमाने सहभागी झाली होती. यामध्ये दोन्ही देशांनी ‘एकास एक’ या पद्धतीने सराव केला. यात दोन्ही दलांतील वैमानिकांनी एकमेकांच्या लढाऊ विमानांच्या क्षमतांची माहिती घेतली. तसेच, उड्डाण सुरक्षा नियम, हवाई क्षेत्रातील कार्यपद्धती, विमानांचे उड्डाण व उतरण्याच्या प्रक्रिया आणि आपत्कालीन परिस्थितीतील प्रतिसाद यांवरही भर देण्यात आला.
भारतीय हवाई दलाच्या ताफ्यामध्ये राफेल ही सर्वांत अत्याधुनिक विमाने आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही या विमानांचे महत्त्व दिसून आले आहे. या सरावामुळे चीनला राफेल विमानांचा सामना कसा करता येईल, याचा सराव करण्याची संधी मिळाली. भारत आणि इजिप्तकडे असणाऱ्या राफेल विमानांमध्ये सेन्सर, शस्त्रे यांमध्ये फरक आहे. मात्र, विमानाचा अंदाज येण्यासाठी चीनला हा सराव पुरेसा ठरू शकतो, असे मानले जात आहे.