विश्रांतवाडी, ता. २६ : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून धानोरी येथील सोलिटेअर सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये पर्यावरण रक्षणासाठी ‘कापडी पिशवी बँक’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्लॅस्टिक प्रदूषणाची समस्या दूर करण्यासाठी आणि कापडी पिशव्यांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
वाढत्या प्लॅस्टिक वापरामुळे पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ही पिशवी बँक स्थापन करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत सोसायटीमधील रहिवासी खरेदीसाठी जाताना येथून मोफत कापडी पिशवी नेऊ शकतात. वस्तू घरी आणल्यानंतर ती पिशवी पुन्हा बँकेत जमा करायची आहे, जेणेकरून इतर रहिवाशांनाही तिचा वापर करता येईल. या उपक्रमाद्वारे प्लॅस्टिक पिशव्यांना सक्षम पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असून, पर्यावरण संरक्षणात नागरिकांचा सामूहिक सहभाग निश्चित करण्यात आला आहे.
सोलिटेअर सोसायटीमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात. संस्थेत दर महिन्याला प्लॅस्टिक आणि ई-कचरा संकलन मोहीम राबवली जाते. या मोहिमेत जमा झालेला कचरा पुनर्वापर आणि अपसायकलिंगसाठी पूर्णम इको व्हिजन संस्थेकडे सुपूर्त केला जातो. यापूर्वी सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणही करण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबाने प्लॅस्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर केल्यास स्वच्छ आणि हरित पर्यावरणाचे ध्येय साध्य होऊ शकते, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या उपक्रमासाठी सोलिटेअर सोसायटीचे अध्यक्ष राज भारद्वाज, सचिव नीलेश मोहिते, खजिनदार प्रशांत कुमार आणि सोसायटी समितीचे सहकार्य लाभले आहे. या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.