डांबराऐवजी कोल्डमिक्सचा वापर
सातारा शहरातील रस्ते होताहेत खड्डेमुक्त; पालिकेकडून उपाययोजना
सातारा, ता. ४ : युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबराची उपलब्धता होण्यास अडचणी येत असल्याने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेने खड्डे बुजविण्यासाठी कोल्डमिक्सचा वापर सुरू केला आहे. या कामामुळे मिरवणूक मार्गासह शहरातील प्रमुख रस्ते आणि कुंभारवाड्याकडे जाणाऱ्या रस्ते खडेमुक्त होण्यास सुरुवात झाली आहे.
सततचा पडणारा पाउस, पाण्याचा निचरा होण्यासाठीची अपुऱ्या सुविधांमुळे साताऱ्यातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमधून जाताना नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत होता. त्यातच गणेशोत्सवाचे वेध सर्व सातारकरांना लागले. यामुळे रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांसह सामाजिक संघटना, गणेश मंडळांकडून पालिकेकडे होऊ लागली. या मागणीनुसार पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याबाबतची कार्यवाही जलदगतीने करण्याच्या सूचना बांधकाम विभागास केल्या. यानुसार बांधकाम विभागाने शहरातील सर्व प्रमुख, तसेच मिरवणूक व गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मार्गाची पाहणी करत रस्ते दुरुस्तीच्या काम हाती घेतले.
यासाठी पालिकेने त्रयस्थ यंत्रणा नेमली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे हॉटमिक्स डांबर उपलब्ध होण्यावर मर्यादा येत असल्याने, तसेच चढ्या दरामुळे कोल्डमिक्स डांबराचा वापर करण्याचा निर्णय घेतला. यानुसार गेल्या चार दिवसांपासून मंगळवार तळे, शाहूपुरी रस्ता, गडकर आळी, बोगदा परिसर, यादोगोपाळ पेठ, राजवाडा परिसरातील खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण केले आहे. आगामी काळात इतर भागातील, तसेच गणेशमूर्ती नेण्यात येणाऱ्या मार्गावरील खड्डे बुजवण्यात येणार आहेत. शक्य त्याठिकाणी कोल्डमिक्सचा वापर करण्यासह इतर उपमार्ग व कमी वर्दळीच्या रस्त्यांवर खड्डे बुजवण्यासाठी मुरमाचा वापर पालिकेकडून करण्यात येणार आहे.
.............
बोगदा ते समर्थ मंदिर या टप्प्यातील रस्त्याचे रुंदीकरण पालिकेने केले असून, याठिकाणच्या रस्त्याच्या दुरस्तीसह त्याठिकाणी गटारे तयार करण्यात येत आहेत. हे करत असतानाच विद्युत खांबांचे स्थलांतरण आणि पथदिव्यांची दुरुस्ती देखील करण्यात येत आहे. सद्यःस्थितीत हा मार्ग खड्डेमुक्त करण्यासाठीचे काम सुरू आहे.
...........
हॉटमिक्ससाठी आवश्यक असणारे डांबर उपलब्ध होण्यात अडचणी येत असल्याने पालिकेने खड्डे बुजवण्यासाठी १० टन कोल्डमिक्स डांबर खरेदी केले आहे. या डांबराच्या मदतीने खड्डे बुजवण्यात येत असल्याने अनेक रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे.
..........
47056
सातारा : कोल्डमिक्सने खड्डे बुजवताना पालिकेची यंत्रणा. (प्रमोद इंगळे : सकाळ छायाचित्रसेवा)
------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.