काँग्रेससमोरचे वैचारिक संकट (फोटो - काँग्रेसचे चिन्ह)
येत्या चार महिन्यांत पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांसोबत आघाडी करण्याच्या पर्यायावर काँग्रेस नेतृत्व गंभीरतेने विचार करीत आहे. मात्र डाव्यांसोबत युती करू नये, असे आग्रह करत केरळ काँग्रेसने नेतृत्वासमोर अडचण निर्माण केली आहे. केरळमध्ये डाव्यांचे सरकार उलथवून लावण्यासाठी काँग्रेसने सगळी ताकद पणास लावली आहे. अशा स्थितीत एकाचवेळी एका राज्यात सोबत तर दुसऱ्या राज्यात विरोधात, अशी भूमिका कशी काय चालणार, असे केरळ काँग्रेसचे म्हणणे आहे. दहा वर्षांपासून केरळमध्ये डाव्यांचे सरकार सत्तेत आहे. यावेळी सत्ता विरोधी लाटेचा फायदा घेत सत्तेत येऊ, असा काँग्रेसचा विश्वास आहे. लोकसभा निवडणुकीवेळी वायनाड मतदारसंघात राहुल गांधी यांनी विजय प्राप्त केला होता. तर त्यांच्या राजीनाम्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत प्रियांका गांधी-वद्रा यांनी निवडणूक जिंकली होती. प्रियांका या सातत्याने केरळचा दौरा करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये पक्षाने डाव्यांशी आघाडी केली, तर केरळमध्ये भाजपच्या हाती आयता मुद्दा येईल, अशी भीती काँग्रेसच्या प्रादेशिक नेत्यांना आहे. वैचारिक संकटावर काँग्रेसचे नेतृत्व कशा पद्धतीने मार्ग काढणार, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
नेत्यांची आयात-निर्यात (फोटो - वैथिलिंगम, टीटीव्ही दिवाकरन)
तमिळनाडू विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली असताना नेत्यांच्या आयात-निर्यातीला सुरुवात झाली आहे. अण्णा द्रमुकमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या आणि माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांचे कट्टर समर्थक असलेल्या वैथिलिंगम यांनी द्रमुकमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे अम्मा मक्कल मुन्नेत्र कझगम पक्षाचे नेते टी. टी. व्ही. दिनाकरन हे भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) परतले आहेत. दिवंगत नेत्या जयललिता यांच्या मैत्रीण शशिकला यांचे दिनाकरन हे पुतणे आहेत. भ्रष्ट द्रमुक सरकारला पराभूत करण्याचा मोठा उद्देश ठेवत आपण ‘एनडीए’मध्ये आलो असल्याचे दिनाकरन यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे दिनाकरन ‘एनडीए’चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार ई. पलानीस्वामी यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. प्रादेशिक राजकारणात महत्त्व कमी झाल्यामुळेच दिनाकरन यांनी पलानीस्वामी यांच्याशी पॅचअप केल्याचे मानले जात आहे. जयललिता सरकारमध्ये अनेक महत्त्वाची खाती सांभाळलेल्या वैथिलिंगम यांच्या पक्ष प्रवेशामुळे द्रमुकला तंजावर जिल्ह्यात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. एकेकाळी मोठा दबदबा असलेले वैथिलिंगम त्यांच्या समर्थक नेत्यांना द्रमुकमध्ये आणू शकतात. वैथिलिंगम यांच्या पक्ष प्रवेशाचा द्रमुकला कितपत लाभ होणार, हे येणारा काळच सांगणार आहे.
फिरोज गांधींचे ड्रायव्हिंग लायसन्स (फोटो - PNE26V89578)
काँग्रेसचे नेते राहुल गांधींना त्यांच्या रायबरेली दौऱ्यात अनपेक्षित भेट मिळाली. ही भेट म्हणजे आजोबा फिरोज गांधींचे ड्रायव्हिंग लायसन्स. फिरोज गांधी हे दोन वेळा रायबरेलीचे खासदार राहिले होते. त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स स्थानिक कुटुंबाने जपून ठेवले होते. राहुल गांधी रायबरेलीच्या दौऱ्यावर आल्यानंतर रायबरेली प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या आयोजन समितीचे सदस्य विकास सिंह यांनी त्यांच्याकडे ते सुपूर्द केले. आजोबांचे ड्रायव्हिंग लायसन्स हातात पडताच राहुल गांधींनी काही काळ ते निरखून पाहिले आणि लगेच त्याचा फोटो काढून मातोश्री सोनिया गांधींना व्हॉट्सअॅपवर पाठवले. उपस्थित कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनाही भावूक करणारी ही घटना रायबरेली आणि गांधी कुटुंबाला जोडणारा दुवा ठरली.
खासदारांच्या हजेरीसाठी नवी शिस्त (फोटो - ओम बिर्ला)
लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी संसदेत खासदारांच्या उपस्थितीबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून आता लोकसभेतल्या खासदारांची हजेरी सभागृहातील आपल्या आसनावरील उपस्थितीनंतरच नोंदविली जाणार आहे. संसदेच्या परिसरात सभागृहाबाहेर उभे राहून हजेरी लावण्याची जुनी पद्धत आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर कोणत्याही कारणाने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले, तर त्यानंतर कोणत्याही खासदाराला आपली हजेरी नोंदवता येणार नाही. खासदारांची हजेरी नोंदविण्यासाठी लोकसभेत प्रत्येक आसनावर आवश्यक कन्सोल आधीच बसवण्यात आले आहेत. या निर्णयामुळे खासदारांना रोजच्या कामकाजाच्या सुरुवातीपासूनच सभागृहात उपस्थित
राहण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असे लोकसभाध्यक्षांचे म्हणणे आहे. म्हणजेच, दांडीबहाद्दर खासदारांना सभागृहात पोहोचणे बंधनकारक राहणार आहे.
‘जी रामजी’ नव्हे ‘ग्राम जी’ (फोटो - रोजगार हमी)
ग्रामीण भागातील रोजगार हमीच्या महात्मा गांधी नरेगा योजनेत बदल करणाऱ्या विकसित भारत जी राम जी कायद्याच्या प्रचारासाठी सरकारने कंबर कसली आहे. तर मनरेगा बचाओ संग्राम आंदोलन करणाऱ्या काँग्रेसने या कायद्याचे सरकारी नाव उच्चारण्याऐवजी ‘विकसित भारत ग्रामजी कायदा’ असे बोलणे सुरू केले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक आले तेव्हा चर्चेमध्ये काँग्रेसच्या खासदारांनी विकसित ‘भारत जी राम जी’ असा उल्लेख केला होता. मात्र, कायद्यात रूपांतर झाल्यानंतर काँग्रेसने त्यासाठीची रणनीती बदलली आहे. आता काँग्रेसचे नेते एक तर मनरेगा बदलणारा कायदा असा आडवळणाने उल्लेख करत आहेत. नाही तर ‘ग्रामजी’ कायदा म्हणू लागले आहेत. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही दिल्लीतल्या कार्यक्रमात बोलताना ग्रामजी कायदा असेच म्हटले होते.
कूटनीतीला नव्या पैलूची जोड (फोटो - मोदी-नाह्यान यांचा कारमधील फोटो)
भारताच्या परराष्ट्र धोरणाला व्यक्तिगत स्नेहाची उब देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका, रशियासह बहुतांश देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे स्वागत करताना आलिंगन देण्याचा नवा ट्रेंड सुरू केला. त्याची सुरुवात त्यांनी क्योटो येथे जपानचे दिवंगत माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्या गळाभेटीने केली होती. बारा वर्षांनंतर हा ट्रेंड आजही कायम आहे. पंतप्रधान मोदी यांच्यापूर्वी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर कूटनीतीला असा आयाम कुठल्याही राष्ट्रप्रमुखाने दिला नव्हता. त्यांच्यामुळे कूटनीतीच्या वर्तुळात ‘हगोप्लसी’ या नव्या इंग्रजी शब्दाची भर पडली. या कूटनीतीत पंतप्रधान मोदी यांनी आणखी एक नवी भर घातली आहे. ती म्हणजे प्रमुख विदेशी राष्ट्रप्रमुखांचे विमानतळावर स्वागत करून गळाभेट दिल्यानंतर एकाच वाहनातून त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा करीत त्यांच्या निवासाची व्यवस्था असलेल्या हॉटेलपर्यंत जाण्याची. गेल्या वर्षी शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी एकाच वाहनातून प्रवास करीत घनिष्ठता दाखवली. पुतीन भारतभेटीवर आले असता दिल्ली विमानतळावर त्यांचे स्वागत केल्यानंतर मोदी त्यांच्यासोबत एकाच वाहनातून गेले. संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान दिल्लीत आले असताना त्याचीच पुनरावृत्ती झाली. गळाभेटीसोबत वाहनात सोबत करण्याचा प्रकारही आता मोदींच्या कूटनीतीचा भाग बनला आहे.
‘प्रभावक्षेत्रा’त नवीन अध्यक्ष (फोटो - नितीन नवीन, अमित शहा)
भाजपचे सर्वांत तरुण राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने ल्युटन्स दिल्लीत ९, सुनहरी बाग रोड हा बंगला बहाल करण्यात आला आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नितीन नवीन यांच्या पदग्रहण सोहळ्यातच पंतप्रधान मोदी यांनी ते आपले ‘बॉस’ असल्याचे जाहीर केले आहे. पण त्यांना देण्यात आलेल्या तीन एकर क्षेत्रफळातील बंगल्याचे ठिकाण लक्षात घेता पंतप्रधानांचे विधान गंभीरपणे घेता येणार नाही. भाजपच्या एकूणच कारभारावर पंतप्रधान मोदी आणि त्यांचे विश्वासू गृहमंत्री अमित शहा यांची निर्विवाद पकड आहे. नितीन नवीन यांचा बंगला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या बंगल्याच्या शेजारी असला तरी तो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ६ ए कृष्ण मेनन मार्ग बंगल्याच्या जवळ आहे. म्हणजेच नवीन हे अमित शहांच्या ‘प्रभावक्षेत्रा’खाली असतील. सुनहरी बाग परिसरातील काही बंगल्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी कृष्ण मेनन मार्गावरून जाण्यावाचून पर्याय नसतो आणि हा मार्ग अमित शहा यांच्या सुरक्षेच्या कारणांमुळे बॅरिकेड लावून बंद करण्यात आला आहे. म्हणजे नवीन यांच्या भेटीला येणाऱ्यांवर सुरक्षा जवानांची विशेष नजर असेल. अमित शहा यांच्या या ‘प्रभावक्षेत्रा’मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि सरन्यायाधीश होण्यापूर्वी विद्यमान सरन्यायाधीश सूर्य कांत हेही राहिलेले आहेत.
राहुल गांधींचा हेकटपणा भोवणार? (फोटो - राहुल गांधी, शशी थरूर)
काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या व्यक्तिमत्त्वातील संघर्ष आता विकोपाला पोहोचला आहे. कोचीमध्ये काँग्रेसच्या एका जाहीर कार्यक्रमात शशी थरूर यांचे भाषण सुरू असताना राहुल गांधी पोहोचले. पण थरूर यांनी सौजन्याने वागूनही राहुल गांधी यांनी त्यांची साधी दखलही घेतली नाही. सर्वांदेखत आणि विनाकारण झालेल्या या अपमानाने संतापलेल्या थरूर यांनी केरळच्या विधानसभा निवडणूक तयारीसाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बोलविलेल्या बैठकीकडे पाठ फिरवली. काँग्रेसने बैठकींना निमंत्रित करायचे आणि थरूर यांनी अनुपस्थित राहायचे, हा आता नित्याचाच प्रकार झाला आहे. त्यासाठी राहुल गांधी आणि शशी थरूर यांच्यातील सुप्त संघर्ष कारणीभूत ठरला आहे. शशी थरूर यांची केरळमधील काँग्रेसजनांनी खूप मनधरणी करून आणि समजूत काढून त्यांना काँग्रेसच्या प्रचारासाठी सक्रिय करण्यात यश मिळविले होते. पण राहुल गांधी यांच्या हेकटपणामुळे स्थानिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले. शशी थरूर यांनी कितीही प्रयत्न केले तरी ते पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधी यांना आव्हान देऊ शकत नाहीत. अशा स्थितीत पक्षहितासाठी सर्वोच्च नेत्याने उदार मनाचा परिचय घडवायचा असतो. पण राहुल गांधी यांनी ही संधी गमावली. यापूर्वी केरळमध्ये सलग दोन वेळा विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या काँग्रेसला यंदा त्याची काय किंमत मोजावी लागेल याचीच आता चर्चा सुरू आहे.
(या सदरासाठी अजय बुवा, सागर पाटील यांनी लेखन केले आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.