सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.२९ ः ‘मतदारयाद्यांची सखोल फेरपडताळणी (एसआयआर) मोहीम रद्द करावी आणि ज्ञानेशकुमार यांना मुख्य निवडणूक आयुक्तपदावरून हटविण्यात यावे,’ या मागणीसाठी एक नोव्हेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या आंदोलनापूर्वी काँग्रेसकडून उद्या (ता.३०) ‘अभिरूप संसद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये कुमार यांच्याविरोधात जन महाभियोग चालविला जाणार आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या ‘१०- राजाजी मार्गा’वरील निवासस्थानी होणाऱ्या अभिरूप संसदेत पीठासीन अधिकारी म्हणून लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार या कामकाज पाहतील. ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात खर्गे महाभियोग प्रस्ताव सादर करतील तर राहुल गांधी हे सर्वांत शेवटी आपले म्हणणे मांडतील. काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीतील विविध पक्ष, सिव्हिल सोसायटीचे सदस्य आणि ‘एसआयआर’ प्रक्रियेमुळे प्रभावित झालेले लोक यावेळी आपली बाजू मांडणार आहेत. अभिरूप संसदेच्यानिमित्ताने विरोधी पक्ष हे मतदारयाद्यांची फेरपडताळणी ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात निषेध नोंदविणार आहेत.
खर्गे म्हणाले...
- आता मतपत्रिकेच्या माध्यमातून निवडणुका घेतल्या जाव्यात. एखाद्या निवडणुकीतील जय-पराजयाच्या आधारे त्या पक्षाचे अस्तित्व संपले असल्याचा निष्कर्ष काढला जाऊ शकत नाही. भाजपने कर्नाटकच्या निकालावरून अहंकार बाळगू नये.
- सर्व पक्ष हे ज्ञानेशकुमार यांना हटविण्याच्या मागणीचे समर्थन करत आहेत. ‘रामलीला’वर होणाऱ्या आंदोलनात ‘इंडिया’ आघाडीतील सर्व पक्षांचे नेते, कार्यकर्ते हजर राहतील. आगामी काळात आमचा संघर्ष चालू राहणार आहे. लोक लढणार नाहीत, तोपर्यंत ते जागृत होणार नाहीत.
सत्ताधाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या राहणार
अभिरूप संसद कार्यक्रमावेळी सत्ताधारी पक्षासाठी रिकाम्या खुर्च्या ठेवल्या जाणार आहेत. सायंकाळी चार ते आठ यादरम्यान हा कार्यक्रम चालणार असून त्यात वीसपेक्षा जास्त नेत्यांची भाषणे होणार असल्याचे समजते. यापूर्वी अशोका हॉटेल किंवा रामलीला मैदानावर हा कार्यक्रम घेण्याची काँग्रेसची योजना होती. मात्र त्याला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली नव्हती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.