सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. १ : काँग्रेस पक्ष मतदारांना ‘कन्व्हेन्स’ (प्रबोधन) करून नव्हे, तर ‘कन्फ्युज’ (भ्रमित) करून मते लाटत आहे. विकास काँग्रेसच्या रक्तात नाही, अशी टीका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अल्झायमर झाल्याने ते काहीही बारगळत असल्याचेही बावनकुळे म्हणाले.
बावनकुळे म्हणाले की, विरोधी पक्षांनी २०२९ मध्ये देशात अराजकता पसरवून सत्ता हस्तगत करण्याची भूमिका घेतली आहे. घटनात्मक संस्थांविरोधात आंदोलने उभारून समाजाची दिशाभूल करण्याचे आणि परदेशी निधीला साथ देण्याचे काम काँग्रेस आणि सहकारी पक्ष करत आहेत. नागपूर हे देशाचे सामाजिक व वैचारिक केंद्रस्थान असल्याने या विरोधातील लढ्याची सुरुवात केली जात आहे. बोगस संसद भरवणाऱ्या काँग्रेसची पोलखोल आता आम्ही जनतेच्या संसदेत जाऊन करणार आहोत. राज्यघटना कमकुवत करणाऱ्या काँग्रेसला जनताच घरी पाठवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
१९९९ ते २००२ च्या मतदार याद्यांमध्ये लाखो दुबार नावे आढळली. पारदर्शक निवडणुकीसाठी अचूक मतदार यादी तयार करून बोगस नावे वगळणे गरजेचे आहे. मात्र, काँग्रेसला बोगस मतदारांच्या जोरावर निवडून येण्याची कीड लागली आहे, अशी टीका त्यांनी केली.
‘सपकाळांची मानसिकता नकारात्मक’
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मानसिकता नकारात्मक आहे. रामटेकची जागा जिंकली की ईव्हीएम चांगले आणि नागपुरात नितीन गडकरी जिंकले की ईव्हीएम खराब, असा दुटप्पीपणा काँग्रेस करत आहे. केरळमध्ये ‘एसआयआर’ प्रक्रियेमुळे पारदर्शक मतदान झाले, असे स्वतः काँग्रेस नेते रमेश चेन्निथला म्हणाले आहेत. त्यामुळे सपकाळ यांनी आधी चेन्निथला यांच्याकडून माहिती घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.