पुणे, ता. २२ : ‘‘संविधान म्हणजे केवळ सामान्य नागरिकांसाठी करण्यात आलेले नियम नसून, सरकारला चौकटीत बांधून ठेवणारी व्यवस्था आहे. लोकशाही म्हणजे बहुमताचे राज्य नव्हे, तर कायद्याचे राज्य होय. जनतेला जो न्याय लागू होतो, तोच सरकारलाही लागू झाला पाहिजे. मात्र, सरकारच्या मनमानी कारभारामुळे आज ही परिस्थिती दिसून येत नाही’’, अशी टीका ज्येष्ठ लेखक व पत्रकार सुरेश द्वादशीवार यांनी केली.
गांधीवादी विचारवंत व युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या ८५ व्या जन्मदिनानिमित्त गांधी भवनात आयोजित ‘संविधानासमोरील प्रश्न’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार उल्हास पवार, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त सचिव अन्वर राजन, पर्यावरणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, ॲड. असीम सरोदे, ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर, रवींद्र पोखरकर, प्रवीण सप्तर्षी, प्रमोद वागदरीकर आदी उपस्थित होते.
द्वादशीवार म्हणाले, ‘‘समाजवाद म्हणजे गरिबांच्या बाजूने उभे राहणे. गांधीवादाचीही ठरावीक चौकट नाही. महात्मा गांधी परिस्थितीनुसार स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घेत असत. त्याचप्रमाणे डॉ. सप्तर्षी कोणाचेही अनुयायी नव्हते. त्यांनी कोणत्याही विचारसरणीच्या चौकटीत अडकून न पडता स्वतंत्र संघटन उभे केले.’’ सूरज कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. तेजस भालेराव यांनी आभार मानले.
...तर सरकार वठणीवर येईल
‘‘संविधानाची उद्देशिका ही घटनेचा पाया आहे. नागरिकांना आपले घटनात्मक अधिकार समजले तर सरकारला जाब विचारता येईल आणि सरकारला वठणीवरही आणता येईल. देशाने संविधानाच्या मूळ चौकटीकडे पुन्हा गांभीर्याने पाहण्याची गरज आहे’’, असे आवाहन सुरेश द्वादशीवार यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.