कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा
विद्यापीठावर ५.१० कोटींचा अतिरिक्त भार
शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याची गरज; वेतनवाढीच्या निर्णयामुळे कामबंद आंदोलन मागे
अॅग्रोवन वृत्तसेवा
परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कंत्राटी कर्मचारी व कामगारांच्या मानधनावर सध्या वार्षिक १६ कोटी ८८ लाख ४८ हजार रुपये खर्च होत आहे. वेतनवाढ केल्यास विद्यापीठाच्या खर्चात ५ कोटी १० लाख रुपयांची वाढ होऊन हा खर्च २१ कोटी ९८ लाख ८४ हजार रुपये होणार आहे. महसुली उत्पन्नातून हा वाढीव खर्च करणे विद्यापीठाला शक्य नसल्याने शासनाने यासाठी निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. अन्यथा वेतनवाढ केल्यास कंत्राटी कर्मचारी-कामगारांची संख्या कमी करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. दरम्यान, विद्यापीठ स्तरावरून कुशल व अकुशल कामगारांच्या वेतनवाढीचा निर्णय घेण्यात आल्याने शुक्रवारी (ता. ७) बेमुदत कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षण संचालनालयांतर्गत विविध कार्यालये, प्रक्षेत्रे, संशोधन केंद्रे आणि महाविद्यालयांतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी निवृत्त होत आहेत. शासनाकडून नवीन भरती केली जात नसल्याने कंत्राटी पद्धतीने वाहनचालक, संगणक चालक, कार्यालयीन मदतनीस, स्वच्छता कामगार आणि प्रक्षेत्रावरील मजूर अशी एकूण १ हजार २६० कर्मचारी-कामगार कार्यरत आहेत. त्यामध्ये ३६० कुशल आणि ९०० अकुशल कामगारांचा समावेश आहे.
कुशल कामगारांच्या मानधनात प्रतिदिन ४६७ रुपयांवरून ८५५ रुपये, तर अकुशल कामगारांच्या मजुरीत ३०३ रुपयांवरून ४६४ रुपये प्रतिदिन वाढ करण्याची मागणी आहे. मात्र, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन व मजुरीसाठी शासनाकडून स्वतंत्र निधी मिळत नसल्याने हा खर्च विद्यापीठाला स्वतःच्या महसुलातून करावा लागतो. वेतनवाढ झाल्यास विद्यापीठावर सुमारे ५ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या नियंत्रक कार्यालयातील सूत्रांनी दिली.
गैरप्रकार करणाऱ्या कंत्राटदारांविरुद्ध कारवाईची मागणी
विद्यापीठाच्या यादीतील ४८ ते ५२ कंत्राटदारांकडून कुशल व अकुशल कामगारांची भरती केली जाते. अनेक कंत्राटदार दरमहा कामगारांच्या वेतनातून १,००० ते १,२०० रुपये कपात करतात. तसेच भविष्य निर्वाह निधी (पीएफ) वेळेवर जमा करत नाहीत. देयके अदा करण्यासाठी काही कंत्राटदार संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत असल्याच्याही तक्रारी आहेत.
काही कार्यालयांत कंत्राटी कर्मचारी केवळ कागदोपत्री असून प्रत्यक्षात कामावर नसल्याचे, तसेच एकाच कामगाराकडून दोन ठिकाणी काम करून घेतले जात असल्याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रारी आल्या आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीला अनेक गैरप्रकार निदर्शनास आले आहेत. त्यामुळे गैरप्रकार करणारे कंत्राटदार तसेच त्यामध्ये सहभागी असलेल्या विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कामबंद आंदोलन मागे
विद्यापीठ स्तरावरून कुशल कामगारांना प्रतिमहिना ३ हजार रुपये, तर अकुशल कामगारांना प्रतिमहिना १ हजार ८०० रुपये वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कंत्राटी कामगारांचे बेमुदत कामबंद आंदोलन शुक्रवारी (ता. ७) सहाव्या दिवशी मागे घेण्यात आल्याची माहिती स्वाभिमानी कामगार संघटनेचे किशोर ढगे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.