पळसदेव, ता. १ : कळस (ता. इंदापूर) येथील खडकवासला कालव्यावरील ४८ क्रमांकाच्या वितरिकेच्या निकृष्ट दर्जाचे काम थांबवण्यास सांगितल्याने ठेकेदाराने कार्यकारी अभियंत्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी ठेकेदार प्रचित इंगवले याच्याविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळस येथील ४८ क्रमांकाच्या वितरिकेच्या दुरुस्तीसाठी ९.७७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, ठेकेदाराकडून अंदाजपत्रकानुसार काम होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. रविवारी (ता. २२ फेब्रुवारी) कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी कामाची पाहणी केली असता, काँक्रिटीकरणाला चिरा पडल्याचे व जलवाहिन्यांचे नुकसान झाल्याचे आढळले. हे काम थांबवण्याची सूचना दिल्यानंतर मंगळवारी (ता. २४ फेब्रुवारी) इंगवलेने देशमुख यांना धमकावल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ अभियंता संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे आणि त्याची नोंदणी रद्द करावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष उन्मेश मुडबिद्रीकर व प्रभारी सरचिटणीस सुरेश भांगे यांनी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या कामाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.