वादग्रस्त ठराव सरपंचांकडून रद्दबातल
पुणतांबे, ता. १० ः महात्मा गांधी जयंतीनिमित्त पार पडलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी मागील ग्रामसभेच्या इतिवृत्तास आक्षेप घेतला होता. त्या ग्रामसभेत झालेल्या काही ठरावांवर कुठलीही चर्चा झाली नाही, तरीही ते ठराव कसे नोंदले गेले, यावर काल झालेल्या ग्रामसभेत वादंग झाले. अखेर सभेच्या अध्यक्ष सरपंच स्वाती पवार यांनी वादग्रस्त ठराव रद्दबातल ठरवल्याची घोषणा केली.
ग्रामसभेत पिण्याच्या पाण्यावर प्रदीर्घ चर्चा झाली. ग्रामपंचायत माजी सदस्य चंद्रकांत वाटेकर यांनी पाणीपुरवठा योजनेतील त्रुटींबाबत अधिकाऱ्यांकडे माहिती मागितली. जलजीवन मिशन पाणी योजनेचे काम ६० ते ७० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित कामाला निधी अपुरा पडला आहे, असे जलजीवन शाखा अभियंत्यांनी सांगितले. पाणी योजनेच्या ठिकाणी फिल्टर व्यवस्था नाही. ग्रामस्थांना विकतचे पाणी घ्यावे लागते. कित्येक भागात अद्याप नळांना पुरेसे पाणी मिळत नाही, यासह विविध तक्रारी माजी सरपंच सर्जेराव जाधव, बाळासाहेब कुलट यांनी मांडल्या. परंतु याबाबत अपेक्षित उत्तर मिळाले नाही. पाणी योजनेबाबत विशेष ग्रामसभा घ्या, अशी सूचना संजय जोगदंड यांनी मांडली. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी विकासकामांना प्राधान्य द्यावे; अन्यथा आम्हाला ग्रामपंचायत सत्ताधाऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा वाटेकर यांनी दिला.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पशू सर्वेक्षण सुरू केले आहे. जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे, त्यांना शासनाकडून बियाणे दिली जाणार आहेत. शेतकऱ्यांनी आपली नावे अर्जासह पाठवावीत, असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी अशोक भोंडे यांनी ग्रामसभेत केले. दुष्काळी अनुदान मिळण्यासाठी कृषी विभागामार्फत बाधित पिकांचे ९० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत, अशी माहिती कृषी सहायक वैशाली पुंड यांनी दिली. सदस्य अनिल नळे यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले, तसेच पाणीपट्टी, घरपट्टी वसुलीसाठी ग्रामस्थांचे सहकार्य अपेक्षित आहे, असेही आवाहनही त्यांनी केले. आजच्या ग्रामसभेला ग्रामसेवक उपस्थित नव्हते. परंतु मागील ग्रामसभेत त्यांनी ज्या काही ठरावांस मान्यता दिली होती, त्यात अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यामुळे आज वादंग झाले. तलाठी संजय डोके, माजी सरपंच सुधाकर जाधव, विकास जोगदंड, दादा सांबारे. डॉ. अविनाश चव्हाण, संभाजी गमे, प्रताप वहाडणे आदी मान्यवर उपस्थित होते. या ग्रामसभेकडे विरोधी नेते मंडळींनी पाठ फिरवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.