पुणे

कुकडी नदीकाठी पुन्हा चोरट्यांचा सुळसुळाट

CD

टाकळी हाजी, ता. १० : शिरूर तालुक्यातील शरदवाडी (जांबूत) परिसरात कुकडी नदीकाठी बसवलेल्या सहा शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींमधील तांब्याच्या तारा चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शेतीसाठी पाणी उपसण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
टाकळी हाजी परिसरातील शरदवाडी येथील शेतकरी पोपट सरोदे, हनुमंत जोरी, राणू जोरी, राजू गाडेकर, ज्ञानदेव गांजे आणि राजेंद्र जोरी यांच्या मालकीच्या विद्युत मोटारी कुकडी नदीच्या किनारी बसवलेल्या आहेत. या मोटारींच्या साहाय्याने ते आपल्या शेतीला पाणीपुरवठा करतात. मात्र, रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी या सर्व मोटारींचे पंप खोलून त्यातील हजारो रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्या.
या शेतकऱ्यांसाठी हा प्रकार नवीन नाही. वर्षातून किमान दोन वेळा अशा चोरीच्या घटना घडत असल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे शेती करायची तरी कशी, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. कुकडी नदीप्रमाणेच घोड नदीच्या परिसरातही शेतीपंप आणि तारा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटनांबाबत केवळ तक्रारी नोंदवून घेण्यापलीकडे पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
यापूर्वीही परिसरात गंभीर गुन्हे घडले असून, त्यातील आरोपींवर प्रभावी कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. पोलिसांनी नदीकाठच्या परिसरात रात्रीची गस्त वाढवावी, चोरीच्या घटनांचा तातडीने तपास लावून चोरट्यांच्या टोळीचा बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांना संरक्षण द्यावे, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

संघटित टोळी असल्याचा संशय
अवघ्या काही मिनिटांत पंप उघडून त्यातील तांब्याच्या तारा काढून नेण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे का ? एका रात्रीत अनेक पंप फोडले जात असल्याने ही संघटित टोळी असल्याचा संशय व्यक्त होत आहे.  दरम्यान, या टोळीचा बंदोबस्त न झाल्यास शेती व्यवसाय करणेच अवघड होईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी
शेतीपंपाच्या चोरीची तक्रार दाखल करताना पोलिसांकडून मोटारीची पावती मागितली जाते. अनेक वर्षांपूर्वी घेतलेल्या पंपांची पावती उपलब्ध नसल्यास तक्रार नोंदवून घेण्यासही टाळाटाळ केली जाते. तक्रार दाखल झाली तरी तपासाला गती मिळत नसल्याने चोरट्यांचे मनोबल वाढत आहे, असा थेट आरोप हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी केला आहे.ऊ

IND vs SL: टीम इंडियाला पुन्हा दुखापतीचा फटका? कुलदीपने का केली नाही Warm-up मॅचच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी, नेमकं काय घडलं?

परदेशातलं सुख सोडून भारतात का परतली मृणाल दुसानिस? मालिका नाही तर 'या' दोन गोष्टी ठरल्या कारण; म्हणाली-

Narayangaon Crime : श्री तुळजाभवानी सांस्कृतिक कला केंद्र गोळीबार प्रकरणातील एक जणाला अटक; अटक आरोपी कुविख्यात गुन्हेगार

Rahul Gandhi: अमित शाहांकडे राजीनामा अन् मोदींकडे माफीची मागणी; राहुल गांधींचं खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाले?

प्राजक्ता माळी अन् प्रवीण तरडे यांच्यात टोकाचा वाद आणि गाजलेल्या चित्रपटाचं शूटिंग पडलेलं बंद; काय होतं कारण?

SCROLL FOR NEXT