Corona-Patient
Corona-Patient 
पुणे

पुण्यात नक्की चाललंय तरी काय; उपचाराअभावी तडफडताहेत कोरोना रुग्ण!

गजेंद्र बडे

पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावांमधील कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळानासे झाले आहेत. यामध्ये पुणे शहरालगत असलेल्या गावांमधील रुग्णांची तर खूपच दयनीय अवस्था झाली आहे. या गावांमधील कोरोना रुग्ण उपचाराअभावी अक्षरक्ष: तडफडू लागले आहेत.

यामध्ये पुणे शहराचे दक्षिणद्वार समजल्या जाणाऱ्या गुजरवाडी, निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडींसह उंड्री, पिसोळीतील रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, गुजरवाडीतील एका ६२ वर्षीय महिलेचा उपचाराअभावी घरातच तडफडून मृत्यू झाल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा गलथान कारभार या घटनेला जबाबदार असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. आरोग्य विभागाचे काहीच सहकार्य मिळत नाही. या गावांमध्ये आरोग्य विभागाची टीम फिरकत नाही आणि कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनाही चार-चार दिवस उपचाराअभावी घरातच राहावे लागत आहे.

केवळ आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढू लागली आहे. सद्य:स्थितीत फक्त जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात (नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड वगळता) एकूण १ हजार २३५ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. फक्त ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळणारा पुणे हा राज्यातील पहिलाच जिल्हा ठरला आहे.

ग्रामीण भागातील एकूण रुग्णांपैकी ४३ टक्के म्हणजेच ५२७ कोरोना रुग्ण एकट्या हवेली तालुक्यात आढळून आले आहेत. आतापर्यंत ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांपैकी २७ जणांचे बळी गेले असून यापैकी सर्वाधिक आठ जण हवेली तालुक्यातील आहेत. या तालुक्यातील एकूण रुग्णांपैकी २२ कोरोना रुग्ण या चार वाड्यांमधील तर पिसोळीतील सहा असे तब्बल २८ रुग्ण हे या पाचच गावांमध्ये आहेत.

या भागातील संशयितांना कोरोना चाचणी घेण्यासाठी स्वत:च गाडी करून वाघोली किंवा लोणी काळभोर जावे लागले. कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतरही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून संपर्क साधला गेला नाही. औषधोपचार दूरच. कोरोना पॉझिटिव्ह चाचणी आल्यानंतरही पाच-पाच दिवस रुग्णालयात दाखल केले जात नसल्याचा अनुभव या भागातील कोरोना रुग्णांनी सांगितला.

दरम्यान, उपचारासाठी बेड उपलब्ध नसल्याने आणि अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे कोरोना रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यास विलंब होत असल्याचे खेड-शिवापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एम. राजगे यांनी सांगितले.

आरोग्य विभागाचे चुकतेय कोठे? 

- संशयित रुग्णांच्या तातडीनी दखल घेतली जात नाही.

- कोरोना चाचणी घेण्यासाठीही मोठा विलंब केला जातो.

- संशयितांशी संपर्क साधला जात नाही.

- चाचणी घेण्यासाठी संशयितांना कोवीड केअर सेंटरवर नेण्याची सोय नाही.

-  टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरही रुग्णांशी संपर्क केला जात नाही.

- बेड अपुरे असल्याने रुग्णांवर उपचारास विलंब.

-  घरी असलेल्या रुग्णांना गोळ्या- औषधांचा पुरवठा केला जात नाही.

या हव्यात उपाययोजना 

- उपचारासाठी बेड वाढवावेत.

-  प्रत्येक गावात इन्स्टिट्यूशनल क्वरांटाइन सेंटर सुरू करावे.

- किमान दहा गावांसाठी एक कोवीड केअर सेंटर असावे.

-  पाच ते दहा गावांसाठी एखाद्या मंगल कार्यालयात उपचाराची सुविधा निर्माण करावी.

- कोरोना चाचणीणीसाठी आणि रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यासाठी अँब्युलन्स असावी.

- घरीच ठेवलेल्या रुग्णांना वेळेत गोळ्या-औषधे पुरवावित.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून कोरोना रुग्णांसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. सध्या गावात सुमारे १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून अद्यापही आरोग्य विभागाच्या पथकाने गावाला भेट दिलेली नाही. बेड उपलब्ध होत नसल्याने गावातच एखाद्या हॉलमध्ये उपचारासाठी सोय उपलब्ध व्हावी. त्यासाठी आम्ही मोफत हॉल उपलब्ध करून देण्यास तयार आहोत.
- व्यंकोजी खोपडे, सरपंच, गुजर निंबाळकरवाडी, ता. हवेली.

आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे पुणे शहराचे दक्षिणद्वार समजल्या जाणाऱ्या भागातील गावांमध्ये कोरोना वेगाने वाढू लागला आहे. याचा फटका ग्रामीण भागाबरोबरच शहरालाही बसणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना केल्या पाहिजेत.
- महेश कदम, सामाजिक कार्यकर्ते, कात्रज-भिलारेवाडी.

कोरोना प्रतिबंधासाठी सध्या सरकारी यंत्रणा फारसे काम करत नाहीत. त्यामुळे या यंत्रणांना हलविण्याची गरज नाही. सरकारी यंत्रणांची अनास्थाच संसर्ग वाढीस जबाबदार ठरु लागली आहे.
- गणेश निंबाळकर, निंबाळकरवाडी, ता. हवेली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT