मतमतांतरे
लालूच, लाच यांचा चक्रव्यूह
‘भ्रष्टाचाराचा आजार’ या मथळ्याखालील ‘सकाळ’ची रोखठोक भूमिका समाजातील सर्व घटकांना आरसा दाखवणारी आहे. भ्रष्टाचार हा एका क्षेत्रापुरता सीमित राहिलेला नाही, तर त्याची पाळेमुळे इतर क्षेत्रातही खोलवर रुजलेली दिसून येत आहेत. संस्कृती, संस्कार, परंपरेचे महत्त्व सांगणाऱ्या सुजाण, सुशिक्षित अन् पुरोगामी समाजात हा ‘आजार’ झाला आहे. लाच अन् लालूच या चक्रव्यूहातून बाहेर पडायचे असेल तर गरज आहे ती प्रबळ इच्छाशक्ती अन् कणखर मानसिकतेची.
नितिन दहिवडीकर, पुणे
बचत करणाऱ्यांना आवाहन अप्रस्तुत
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर मल्होत्रा यांनी इंधन दरवाढ ही अपरिहार्य असल्याचे सूतोवाच करून ठेवले. पंतप्रधानांनी इंधनबचतीचे आवाहन केलेच आहे. वास्तविक सर्वसामान्य माणसाला बचतीचे आवाहन करण्याची गरज नाही. त्याची मानसिकता आवश्यक असलेला खर्च भागविण्याकडेच असते. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर कमी होतात, तेव्हा मात्र त्याचा फायदा सर्वसामान्यांना मिळवून दिला जात नाही.
अशोक कोल्हे, पुणे
हे आपल्याला का जमत नाही?
‘नीट’ या परीक्षेचा फज्जा उडाल्याने लाखो विद्यार्थ्यांचा तेजोभंग झाला. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘नीट’ ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा नीट पार पडणे. हे कठीण काम दिसते. मात्र ‘जीआरई’ आणि ‘टोफेल’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील परीक्षा सुरळीत पार पडतात. प्रतिवर्षी तीन लाखांहून अधिक विद्यार्थी परदेशी विद्यापीठांमध्ये मुख्यत: अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘जीआरई’ ही परीक्षा देतात. तर परदेशी विद्यापीठांमध्ये विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इंग्रजीची पात्रता सिद्ध करण्यासाठी वर्षाकाठी २३ लाख विद्यार्थी ''टोफेल'' ही परीक्षा देतात. ‘जीआरई’ आणि ‘टोफेल’ या परीक्षेचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘एज्युकेशनल टेस्टिंग सर्व्हिस’चे कार्यालय अमेरिकेत आहे. विविध देशांत नऊ हजार ‘टेस्टिंग सेन्टर’ आहेत. या ‘इंटरनेट बेस्ड टेस्ट्स’ असून तिथे विद्यार्थी केंद्रात पूर्वनियोजित तारखेला हजर राहिल्यावर ऐनवेळी प्रश्नपत्रिका त्यांच्या संगणकाच्या स्क्रीनवर येते. परिणामी पेपरफुटीची शून्य शक्यता असते. तसेच विद्यार्थी जसजसे प्रश्न सोडवत जातो; तसतशी काठीण्य पातळी वाढत जाते. चुकीच्या उत्तरांस ‘निगेटिव्ह मार्किंग’ असते. तसेच कमी वेळेत जास्त प्रश्न सोडवायचे असतात. त्यामुळे ''कॉपी'' करण्याची शक्यताही दुरावते. मग हे आपल्याला का जमू नये?
डॉ. विकास इनामदार, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.