पुणे, ता. १३ : अपुरी झोप आणि वाढत्या ताणतणावामुळे शरीरातील ‘कॉर्टिसोल’ या संप्रेरकाचे (हार्मोन) प्रमाण वाढून वजन वाढणे, पोटावर चरबी साठणे आणि चेहऱ्यावर सूज येणे, अशा समस्या उद्भवू शकतात. यावर वेळीच अंतःस्रावी तज्ज्ञांचा (एंडोक्रिनोलॉजिस्ट) सल्ला घेऊन उपचार करणे आवश्यक असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे.
कॉर्टिसोलला ‘स्ट्रेस हार्मोन’ म्हणून ओळखले जाते. शरीरातील चयापचय क्रिया नियंत्रित करणे, रक्तातील साखरेचे नियमन आणि ताणतणाव व्यवस्थापनात याची भूमिका महत्त्वाची असते. याचे प्रमाण सकाळी जास्त आणि रात्री कमी असते. मानसिक किंवा शारीरिक ताण आल्यास रक्तातील ‘कॉर्टिसोल’ वाढल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. तसेच हे संप्रेरक शरीरातील सूज कमी करण्यास, रक्तदाब संतुलित ठेवण्यास आणि झोप नियमित राखण्यास मदत करते. मात्र, याचे प्रमाण सातत्याने वाढलेले राहिल्यास आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
‘कॉर्टिसोल’ हार्मोन वाढण्याची प्रमुख कारणे
- अतिताण, सतत मानसिक किंवा शारीरिक तणाव
- सतत कमी किंवा अनियमित झोप घेण्यामुळे शरीरावर ताण पडणे
- मेंदूतील पिट्युइटरी ग्रंथीला गाठ (ट्युमर) येणे
- मूत्रपिंडावरील ऍड्रीनल ग्रंथीमध्ये गाठ किंवा संसर्ग होणे
‘कॉर्टिसोल’ वाढल्याने होतात हे त्रास
- चेहरा, मान आणि पोटाभोवती चरबी जमा होते
- अनियंत्रित रक्तदाब वाढतो आणि हाडांची ठिसूळता वाढते
- त्वचा पातळ होते, सहज जखमा होतात.
- पोटावर, मांड्यांवर जांभळे-लाल रंगाचे पट्टे (स्ट्रेच मार्क्स) येतात.
- तीव्र शारीरिक थकवा आणि रात्री झोप न येण्याची समस्या
- चिडचिड वाढते, नैराश्य आणि तीव्र चिंता जाणवू लागते.
- हात आणि पायांचे स्नायू कमकुवत होतात.
हे शरीरासाठी आवश्यक असलेले संप्रेरक असून, त्याचे प्रमाण दीर्घकाळासाठी वाढलेले राहिल्यास शरीरास वजनवाढीबरोबरच हाडांची ठिसूळता येते आणि रक्तदाब वाढतो. परंतु, हा त्रास सर्वांना होत नाही. वजन नियंत्रित करण्यासाठी व्यायाम, आहार उपाययोजना आवश्यक आहेत. ते करूनही त्रास कमी होत नसल्यास डॉक्टर तपासणी सुचवतात. पोटावरील चरबी वाढण्याचे कारण केवळ ‘कॉर्टिसोल’ असतेच असे नाही. लक्षणे आणि वैद्यकीय इतिहासाच्या आधारे डॉक्टरांच्या सल्ल्याने ती तपासणी करणे महत्त्वाचे आहे.
- डॉ. सुहास खैरे, अंतःस्रावी तज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.