स्लग ः कपाशी सल्ला
आकस्मिक मर रोगासाठी
एकात्मिक उपाययोजना
----------------------
कपाशीतील आकस्मिक मर रोगाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन, योग्य सिंचन, प्रभावी निचरा, मुळांचे संरक्षण, जैविक घटकांचा वापर आणि हवामानानुसार पीक व्यवस्थापन या एकात्मिक उपाययोजनांचा अवलंब करावा.
----------------------
डॉ. अतीश पाटील, डॉ. पंकज पाटील, जगदीश काथेपुरी
------------------------------------------
यावर्षी ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे खरिपाचे नियोजन पूर्णपणे बिघडले आहे. काही भागात अतिवृष्टी, तर काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस अशी स्थिती पाहायला मिळते. पावसाच्या असमान आणि अनियमित वितरणामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टी झालेल्या भागात पाण्याचा निचरा योग्यप्रकारे न होणे, तर कमी पावसाच्या क्षेत्रात बाष्पीभवनातून जमिनीतील ओलावा नाहीसा होत आहे. या दोन्ही विरुद्ध परिस्थितीचा परिणाम पिकाच्या वाढीवर दिसून येत आहे.
कपाशी हे प्रमुख नगदी पीक असून त्याच्या उत्पादनक्षमतेवर विविध अन्नद्रव्यांची कमतरता, हवामानातील बदल आणि कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव याचे मोठे परिणाम होतात. त्यापैकी ‘आकस्मिक मर’ ही अत्यंत गंभीर समस्या मानली जाते. ही समस्या निव्वळ संसर्गजन्य रोग नसून त्यामागे अन्नद्रव्यांची कमतरता, पाण्याचा ताण, तापमानातील बदल इ. यांचा परस्पर परिणाम असतो. उच्च तापमान, पाण्याचा ताण, शेतात साचलेले पाणी, अन्नद्रव्यांचे असंतुलन आणि काही वेळा बुरशीजन्य संसर्ग या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामामुळे कपाशीतील आकस्मिक मर रोगाची समस्या उद्भवते. बऱ्याच वेळा आकस्मित मर रोगाला बुरशीजन्य मर रोग समजले जाते. परंतु प्रत्यक्षात बहुतेक वेळा ही शारीरिक समस्या असते. काही प्रसंगी फ्युझॅरियम ऑक्सिस्पोरम (Fusarium oxysporum), मॅक्रोफोमिना फेसोलिना (Macrophomina phaseolina) यांसारख्या बुरशींचा सहभाग असू शकतो. मात्र बहुतांश भागात आकस्मित मर रोगाचा प्रादुर्भाव होण्यामागे तापमान, पाण्याचा ताण, अतिवृष्टी, शेतात साचलेले पाणी, मुळांचे नुकसान आणि अन्नद्रव्यांचे असंतुलन अशी प्रमुख कारणे आढळून येतात. त्यामुळे केवळ रासायनिक बुरशीनाशकांवर अवलंबून न राहता संतुलित खत व्यवस्थापन, योग्य सिंचन, प्रभावी निचरा, मुळांचे संरक्षण, जैविक घटकांचा वापर आणि हवामानानुसार पीक व्यवस्थापन या एकात्मिक उपाययोजनांचा अवलंब केल्यास आकस्मिक मर मुळे होणारे नुकसान कमी करणे शक्य होते.
----------------------------------------------------
आकस्मिक मर म्हणजे काय?
कपाशीचे झाड पूर्णपणे निरोगी दिसत असताना अचानक पाने कोमेजणे, पिवळी पडणे, फुले व बोंडे गळणे आणि काही दिवसांत संपूर्ण झाड सुकणे याला ‘आकस्मिक मर’ म्हणतात. ही समस्या मुख्यतः पीक वाढीच्या व बोंडे धरण्याच्या अवस्थेत जास्त दिसून येते. कारण या अवस्थेत झाडाची पाणी आणि अन्नद्रव्यांची गरज सर्वाधिक असते.
रोगास पोषक स्थिती ः
- दिवसाचे ३८ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान
- पाण्याचा ताण
- शेतात पाणी साचणे
- भारी काळी जमीन
- निचऱ्याचा अभाव
- कमी सेंद्रिय कर्ब
- एकाच शेतात सतत कपाशी लागवड
- असंतुलित खत वापर
------------------
कारणे ः
१) जास्त तापमान ः
दिवसाचे तापमान दीर्घकाळ ३८ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त राहिल्यास झाडावर तीव्र उष्णतेचा ताण येतो. त्यामुळे बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढतो. पानांतून पाणी कमी होते. मुळांद्वारे होणारे पाणी शोषण कमी होऊन झाडामध्ये जलताण निर्माण होतो.
२) पाण्याचा ताण ः
जमिनीत ओलावा कमी झाल्यावर किंवा दीर्घकाळ पाणी न मिळाल्यास मुळांची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे मुळांची वाढ थांबते. सूक्ष्म मुळे मरतात. अन्नद्रव्यांचे शोषण कमी होते. प्रकाशसंश्लेषण कमी होते. परिणामी झाडाची वाढ थांबते आणि अचानक मर येते.
३) शेतात पाणी साचणे ः
पावसाळ्यात सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्यास मुळांना ऑक्सिजन मिळत नाही. मुळांची श्वसनक्रिया मंदावते. मुळे कुजण्यास सुरुवात होते. त्यामुळे अन्नद्रव्यांचे शोषण बंद होते. ही परिस्थिती देखील आकस्मिक मर रोगास पोषक ठरते.
४) जलवाहिन्यांचे नुकसान ः
पाण्याच्या ताणामुळे अन्नद्रव्ये शोषून घेणाऱ्या जलवाहिन्या फुगीर बनतात आणि नलिका बंद होतात. त्यामुळे अन्नद्रव्य वहनामध्ये अडथळे निर्माण होतात. परिणामी पाने, फुले व बोंडांना पुरेसा अन्नपुरवठा न झाल्याने पानांचा तजेलदारपणा नाहीसा होतो व पाने पिवळी पडतात. त्यानंतर पानगळ, फूलगळ व बोंडे यांची गळ होऊन झाडे मरतात.
आकृती १ ः
आकस्मित मरमुळे खोडावर फुगीरपणा येतो व गाठी बनतात. त्यामुळे अन्नद्रव्य वाहून नेण्यास अडथळा निर्माण होतो.
५) अन्नद्रव्यांचे असंतुलन ः
विशेषतः नत्र, पालाश, मॅग्नेशिअम व बोरॉन यांची कमतरता असल्यास कपाशी झाडाची ताण सहन करण्याची क्षमता कमी करते.
६) बुरशीचा प्रादुर्भाव ः
काही वेळा फ्युझॅरियम विल्ट (Fusarium wilt), व्हर्टिसिलियम विल्ट (Verticillium wilt), चारकोल रॉट Charcoal rot (Macrophomina phaseolina) यांमुळेही मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुळांच्या आतील ऊतक तपकिरी किंवा काळसर दिसून येतात.
-----------------------
कपाशीतील आकस्मिक मर अवस्था व लक्षणे
आकस्मिक मर ही सुरुवातीला सहज लक्षात न येणारी, परंतु अल्पावधीत गंभीर स्वरूप धारण करणारी शारीरिक विकृती आहे. या विकाराची तीव्रता वाढत जात असताना झाडामध्ये विशिष्ट लक्षणे दिसून येतात. सोयीसाठी या लक्षणांचे तीन टप्प्यांमध्ये वर्गीकरण करता येते.
१) सुरुवातीची अवस्था ः
या अवस्थेत झाड बाह्यदृष्ट्या निरोगी दिसत असले, तरी त्यामध्ये जलताण आणि अन्नद्रव्यांच्या वहनात अडथळे निर्माण होण्यास सुरुवात झालेली असते.
लक्षणे ः
- सकाळच्या थंड वातावरणात झाड काहीसे ताजेतवाने व सामान्य दिसते.
- दुपारच्या वाढत्या तापमानात पाने अचानक कोमेजल्यासारखी दिसतात.
- पानांचा नैसर्गिक तजेला कमी होऊन ती निस्तेज व मलूल दिसतात.
- पानांमध्ये तात्पुरता शिथिलपणा जाणवतो.
- संध्याकाळी काही झाडे पुन्हा तजेलदार दिसू शकतात. परंतु ही स्थिती पुढील टप्प्याची पूर्वसूचना असते.
२) मध्यम अवस्था ः
या अवस्थेत मुळांची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या कमी झाल्यामुळे पाणी व अन्नद्रव्यांचा पुरवठा खंडीत होतो. त्याचा परिणाम वनस्पतीच्या वाढीवर व प्रजनन अवस्थेवर दिसून येतो.
लक्षणे ः
- पानांतील हरितद्रव्य कमी झाल्यामुळे हिरवा रंग फिका पडतो.
- पाने पिवळी पडून नंतर निस्तेज होतात.
- पाने खालील बाजूला वाकतात व कायमस्वरूपी कोमेजल्यासारखी दिसतात.
- फुलांची गळ वाढते. त्यामुळे बोंडधारणा कमी होते.
- लहान बोंडे व पाते यांची गळ होते.
- झाडाची वाढ मंदावते. नवीन फुटव्यांची निर्मिती कमी होते.
३) तीव्र अवस्था ः
या अवस्थेत झाडाच्या जलवाहिनी व अन्नवाहिनी ऊतकांची कार्यक्षमता गंभीरपणे बाधित झालेली असते. परिणामी संपूर्ण वनस्पतीमध्ये अपरिवर्तनीय नुकसान होते.
लक्षणे ः
- झाडाची वाढ पूर्णपणे थांबते.
- सर्व पाने सुकून झाड कायमस्वरूपी कोमेजते.
- खोडाचा उभा छेद घेतल्यास आतील जलवाहिनी ऊतक तपकिरी किंवा गडद तपकिरी रंगाचे दिसतात.
- काही प्रकरणांमध्ये मुळे कुजलेली, काळपट किंवा मृत अवस्थेत आढळतात. विशेषतः पाणी साचलेल्या शेतात.
- फुले व बोंडे मोठ्या प्रमाणात गळून उत्पादनात लक्षणीय घट होते.
- अखेरीस संपूर्ण झाड मरते.
४) उत्पादनावर परिणाम ः
आकस्मिक मर मुळे उत्पादनात १० ते ४० टक्के पर्यंत घट येऊ शकते. तीव्र प्रादुर्भावामध्ये सुमारे ५० टक्के पेक्षा जास्त नुकसान होण्याची शक्यता असते.
आकृती २. कपाशीतील आकस्मिक मर लक्षणे
--------------------------
अ) आकस्मिक मर रोग एकात्मिक व्यवस्थापन ः
- योग्य लागवड कालावधी ः बागायती बीटी कपाशीची लागवड मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी.
- नियमित सिंचन ः ८ ते १५ दिवसांच्या अंतराने जमिनीच्या ओलाव्यानुसार सिंचन करावे.
- पाण्याचा निचरा ः शेतामध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. साचलेले पाणी त्वरित बाहेर काढावे.
- संतुलित खत व्यवस्थापन ः माती परीक्षण अहवालानुसार शिफारशीत मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा.
- आपत्कालीन अन्नद्रव्ये व्यवस्थापन ः
झाडावर शारीरिक विकृती लक्षणे दिसताच युरिया १.५ किलो व म्युरेट ऑफ पोटॅश १.५ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून प्रत्येक झाडाच्या बुंध्याजवळ १५० ते २०० मिलि प्रमाणे द्रावणाची आळवणी करावी. त्यानंतर ८ ते १० दिवसांनी डीएपी २ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून प्रत्येक झाडाच्या बुंध्याजवळ १५० ते २०० मिलि प्रमाणे मुळाजवळ द्यावे.
ब) बुरशीजन्य मर रोगाचे व्यवस्थापन ः
जैविक व्यवस्थापन ः
- शेणखतातून किंवा ठिबकमधून (प्रमाण ः प्रति एकर)
महात्मा फुले कृषी विद्यापीठ निर्मित ‘फुले ट्रायकोडर्मा हार्झियानम’ २.५ किलो किंवा
स्युडोमोनास फ्लोरेसेन्स २.५ किलो किंवा
‘फुले सुपर बायोमिक्स’ ४ किलो याप्रमाणे वापर करावा.
- यामुळे मुळांचे आरोग्य सुधारते, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. तसेच जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.
बुरशीनाशकाची आळवणी ः
- कॉपर ऑक्सिक्लोराईड (५० टक्के डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम अधिक युरिया १० ग्रॅम किंवा
कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यूपी) २ ग्रॅम अधिक युरिया १० ग्रॅम
प्रति लिटर पाणी या प्रमाणे घेऊन प्रादुर्भावाची लक्षणे दिसलेल्या झाडाच्या मुळाशी आळवणी करावी.
--------------------------------------------
- डॉ. पंकज पाटील (पीक संरक्षण), ९६०४०८०८१६
- डॉ. अतीश पाटील, ९९२२८१७०१८
(विषय विशेषज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, धुळे)
फोटो ः
आकस्मित मरमुळे खोडावर फुगीरपणा येऊन गाठी बनतात. त्यामुळे अन्नद्रव्ये वहनात अडथळा येतो.
आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.