आळेफाटा/ पिंपळवंडी, ता. २१ : ‘‘लैंगिक विकृतीला आळा घालण्यासाठी समाजाच्या पुढाकारातून सुसंस्कृत व सुरक्षित वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. यासाठी पोलिस यंत्रणा अधिक सक्षम करण्यासोबतच समाजाच्या सहकार्याने गावातील सुरक्षितता वाढविण्याची आवश्यकता आहे,’’ असे मत विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
जुन्नर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केलेल्या मुलीच्या कुटुंबीयांची गोऱ्हे यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ‘‘नसरापूर प्रकरणात ज्याप्रमाणे सक्षम तपास, भक्कम पुरावे आणि प्रभावी न्यायालयीन पाठपुराव्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा झाली, त्याच धर्तीवर या प्रकरणातील आरोपीलाही कठोरातील कठोर शिक्षा मिळावी, त्यासाठी शासन, पोलिस आणि सरकारी वकील यांचा स्तरावर सातत्याने पाठपुरावा करावा. महिला आणि बालिकांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ मुलींवर टाकता येणार नाही. मुले व युवकांमध्ये महिलांचा सन्मान, संमतीचे महत्त्व, लैंगिक संवेदनशीलता, जबाबदार वर्तन आणि कायद्याची जाणीव याबाबत शाळा महाविद्यालयांपासून गाव पातळीपर्यंत सातत्याने प्रबोधन करण्याची गरज आहे.’’
याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, पोलिस निरीक्षक विश्वास जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक बळिराम घनटे उपस्थित होते.
नसरापूरमधील पीडितेच्या
आई-वडिलांकडून सांत्वन
नसरापूर येथील घटनेतील पीडित बालिकेच्या आई-वडिलांनी शनिवारी (ता. २२) पीडित कुटुंबाचे सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला. वेदिका फाउंडेशनच्या माध्यमातून या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत पूर्ण ताकदीने पाठीशी उभे राहण्याचे व सर्व कायदेशीर सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. आमच्यावर कोसळलेल्या दुःखाच्या पहाडानंतर राज्यभरात अशा घटनांमधील पीडित कुटुंबांना आधार देण्यासाठी आणि त्यांना योग्य कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही वेदिका फाउंडेशनची स्थापना केली आहे. १० ते १५ सदस्यांच्या माध्यमातून हे कार्य सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य श्याम माळी, पिंपळवंडीचे माजी सरपंच सोमनाथ माळी, विकास भांगरे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.