मोहरी, जवस, करडईच्या पीक
प्रात्यक्षिकांसाठी अर्जाची संधी
‘आत्मा’तर्फे रब्बी हंगामात शास्त्रीय पीक व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक
वाशीम : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) वतीने रब्बी हंगामात शेतकऱ्यांना आधुनिक व शास्त्रीय पीक उत्पादन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, तसेच सुधारित तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष शेतावर अवलंब वाढावा, यासाठी कमी पाण्यावर घेता येणाऱ्या गहू, मोहरी, जवस व करडई पिकांची पीक प्रात्यक्षिके राबविण्यात येणार आहेत. यासाठी मोहरी, जवस व करडई पिकांच्या प्रात्यक्षिकांसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी शनिवारपर्यंत (ता. १०) अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुधारित वाणांची निवड, बियाणे प्रक्रिया, योग्य बीजदर, पेरणीची पद्धत व पेरणीतील अंतर या बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासोबतच माती परीक्षणावर आधारित संतुलित खत व्यवस्थापन, तण व पाणी व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर तसेच पीक काढणी आणि काढणीनंतरचे व्यवस्थापन या बाबत शास्त्रीय माहिती देण्यात येणार आहे.
मोहरी, जवस व करडई या पिकांची प्रात्यक्षिके घेण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी मुदतीत संबंधित तालुक्यातील तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज साद करावेत. प्रात्यक्षिकासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांनी संबंधित पिकाच्या लागवडीसाठी आवश्यक क्षेत्र उपलब्ध ठेवणे अपेक्षित आहे. तसेच कृषी विभाग व ‘आत्मा’ यांच्याकडून देण्यात येणाऱ्या तांत्रिक मार्गदर्शनानुसार पीक व्यवस्थापन करणे आवश्यक राहणार आहे.
बियाण्याच्या उपलब्धतेनुसार प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमातून शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने पीक उत्पादनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून उत्पादनक्षमता वाढविणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि शेती अधिक फायदेशीर करण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी विहित मुदतीत अर्ज साद करून या पीक प्रात्यक्षिकांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आत्मा प्रकल्प संचालकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.