मार्केट यार्ड, ता. २५ : दररोजच्या भाजीसाठी फोडणीचा अविभाज्य भाग असलेल्या कढीपत्त्याचा बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी सहज उपलब्ध असणारा कढीपत्ता आता जपून वापरण्याची वेळ आली आहे. स्थानिक बाजारात पुरवठा अपुरा पडत असल्याने व्यापाऱ्यांकडून आंध्र प्रदेशातून कढीपत्ता मागविला जात आहे.
एरवी घाऊक बाजारात ५० ते ७० रुपये प्रतिकिलो भावाने विक्री होणारा कढीपत्ता सध्या दुर्मीळ ठरत आहे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आंध्र प्रदेशातून आलेल्या कढीपत्त्याला तब्बल ३५० ते ४०० रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे, तर पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही भाव तेजीत असून, सध्या २०० ते २५० रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. आवक कमी आणि मागणी कायम असल्याने भाववाढीचा हा कल काही काळ टिकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या महिनाभरापासून बाजारात कढीपत्त्याचा तुटवडा जाणवत आहे.
‘महिनाभरापूर्वी कढीपत्त्याची जुडी किरकोळ बाजारात दहा रुपयांना होती. कढीपत्त्याचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर सध्या मुंबई, पुणे, ठाण्यातील बाजारपेठेत कढीपत्त्याच्या एका जुडीची विक्री २० ते ३० रुपये भावाने केली जात आहे,’ असे किरकोळ बाजारातील भाजीपाला व्यापारी प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील दौंड, यवत, केडगाव, तसेच अहिल्यानगर भागातील मांडवगण फराटा भागात कढीपत्त्याची लागवड केली जाते. या भागातून कढीपत्ता पुण्यातील बाजारपेठेत विक्रीस पाठविला जातो. मुंबईतील बाजारपेठेत नाशिक, खेड, मंचर परिसरातून कढीपत्ता विक्रीस पाठविला जातो. मागणीच्या तुलनेत कढीपत्त्याची आवक अतिशय कमी प्रमाणावर होत आहे.
सध्या बाजारात कढीपत्त्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. परिणामी भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आंध्र प्रदेशातून कढीपत्त्याची आवक होत असून, मागणीच्या तुलनेत आवक अपुरी पडत आहे.
- सिद्धार्थ चव्हाण, कढीपत्ता व्यापारी, मार्केट यार्ड
भाजीपाला नियमित खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून कढीपत्त्याचे पैसे घेतले जात नव्हते. मात्र, गेल्या एक ते दीड महिन्यापासून कढीपत्त्याचे भाव तेजीत आहेत. परराज्यांतील कढीपत्त्याचे भाव तेजीत आहेत. कढीपत्ता वाळू नये म्हणून पाणी मारले जाते. घाऊक बाजारातून एक किलो कढीपत्ता खरेदी केला जातो. कढीपत्ता वाळल्यानंतर प्रत्यक्षात त्याचे वजन ८५० ते ९०० ग्रॅम भरते. कढीपत्त्याला पहिल्यांदाच उच्चांकी भाव मिळाला आहे.
- प्रकाश ढमढेरे, फळे भाजीपाला व्यापारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.