पुणे, ता. ६ : एकीकडे सुरू असलेला ढोलताश्यांचा गजर... तर दुसरीकडे चेहऱ्यावर ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या भरात दृष्टिहीन गोविंदाचे एकावर एक थर रचले जात होते. त्यांच्यातील जिद्दीला उपस्थितांकडूनही टाळ्यांच्या कडकडाटात व ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषात प्रोत्साहन दिले जात होते. अखेर, धनश्री पवार या दृष्टिहीन विद्यार्थिनीने पुस्तकाची दहीहंडी फोडली आणि सर्वांनीच या दृष्टिहीन गोविंदांवर कौतुकाचा वर्षाव केला!
दृष्टिहीन विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जिद्द आणि आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता निर्माण व्हावी, यासाठी कुमठेकर रस्त्यावरील अण्णा भाऊ साठे शाळेच्या परिसरात नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड (एनएडब्ल्यूपीसी) या संस्थेतर्फे रविवारी अनोख्या पुस्तक दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. या दहीहंडीसाठी संस्थेचा परिसर रंगीबेरंगी पताका, फुगे आणि फुलांच्या माळांनी सजविण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी गोविंदाच्या गाण्यांसह गायन, वादन आणि पारंपरिक वाद्यांचे सादरीकरण करीत उत्सवाची रंगत वाढविली.
एकमेकांना खंबीर साथ देत दृष्टिहीन विद्यार्थ्यांनी एकावर एक थर रचले. उपस्थितांकडून केल्या जाणाऱ्या सूचनेनुसार विद्यार्थी पुस्तक दहीहंडीच्या दिशेने वाटचाल करू लागले. उपस्थित भाविक, शिक्षक व पाहुण्यांनीदेखील टाळ्यांच्या कडकडाटात व ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषात त्यांना प्रोत्साहन दिले. अवघ्या काही मिनिटांतच अडथळे पार करत जिद्दीच्या जोरावर धनश्री पवार या दृष्टिहीन विद्यार्थिनीने दहीहंडीला स्पर्श करत क्षणार्धात पुस्तकांची दहीहंडी फोडण्याचा मान पटकाविला.
विद्यार्थ्यांच्या जिद्दीला मान्यवरांचा सलाम
ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस, बँक ऑफ इंडियाच्या डॉ. शुभलक्ष्मी एस., बांधकाम व्यावसायिक शिरीष आपटे, ‘एनएडब्ल्यूपीसी’चे संस्थापक अध्यक्ष राहुल देशमुख, देवता अंदुरे यांनी या विद्यार्थ्यांच्या जिद्दीला सलाम करत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. या वेळी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.