पोलिसांचा इशारा; दहीहंडीसाठी शहरात आज चोख बंदोबस्त पुणे - शहरामध्ये शनिवारी साजऱ्या केल्या जाणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी पुणे पोलिस दलाकडून शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. उत्सवामध्ये ध्वनिवर्धकाच्या आवाजाच्या मर्यादेबाबत उच्च न्यायायालयाने घालून दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. शहरातील महात्मा फुले मंडई परिसर, हुतात्मा बाबू गेनू चौक, बेलबाग चौक, शनिपार, जिलब्या मारुती चौक, शिवाजी रस्ता, गुरुवार पेठेतील जैन मंदिर चौक या मध्यवर्ती भागात 73 दहीहंडी उत्सव मंडळे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करतात. तर उर्वरित 910 मंडळे चंदननगर, वडगाव शेरी, विमाननगर, सिंहगड रस्ता, वारजे, कोथरूड अशा उपनगरांमध्ये असून तेथेही मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्यवर्ती भागामध्ये पोलिसांकडून दुपारनंतर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे. याबरोबरच सोनसाखळी, पॉकेट चोरी, महिला-तरुणींची छेडछाड यांसारखे प्रकार टाळण्यासाठी गुन्हे शाखेची पथके, साध्या वेशातील पोलिस सक्रिय राहणार आहेत. उपनगरांमधील दहीहंडी उत्सव मंडळांनी मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या परवानग्या घेतल्या आहेत. तेथेही चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मंडळांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. |