दुधाळ मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी
चितळे डेअरीकडून अनुदान
शेतकऱ्यांना २५ टक्क्यांपर्यंत लाभ; वासरू संगोपनासाठीही अनुदान
ॲग्रोवन वृत्तसेवा
भिलवडी, जि. सांगली : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि दुग्ध व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने मे. बी. जी. चितळे पशुसंवर्धन व विस्तार विभागामार्फत २०२६-२७ साठी जातीवंत दुधाळ मुऱ्हा म्हैस खरेदी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. पात्र शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दोन लाख रुपये किंमतीच्या म्हशीच्या खरेदीसाठी २५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
हरियानातील जिंद, रोहतक आणि हिस्सार परिसरातून खरेदी करण्यात येणाऱ्या जातीवंत मुऱ्हा म्हशींसाठी ही योजना लागू असून, भिलवडी परिसरातील संबंधित उत्पादक केंद्रांशी जोडलेल्या पात्र शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. अनुदान निर्धारित निकषांनुसार टप्प्याटप्प्याने देण्यात येईल. खरेदी केलेल्या म्हशीसाठी पहिले उत्कृष्ट वंशावळीचे सेक्सड सीमेन मोफत, दुसऱ्या कृत्रिम रेतनासाठी ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. संबंधित म्हशीचे दूध चितळे डेअरीच्या उत्पादक केंद्रावर घालणे आवश्यक राहील.
योजनेचा विस्तार म्हणून वासरू संगोपन रेडी अनुदान योजनाही सुरू करण्यात आली आहे. निर्धारित अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र रेडीस पहिल्या वेतासाठी ३००० रुपये, उत्कृष्ट वंशावळीच्या सेक्सड सीमेनने गाभण राहून व्यायल्यानंतर १००० रुपये आणि दुसऱ्या वेतासाठी १००० रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
भिलवडी १-२ अंकलखोप, माळवाडी, सुखवाडी, बोरवन, खंडोबाची वाडी, भुवनेश्वर वाडी, औदुंबर, चोपडेवाडी, महावीरनगर आणि शिंदेमळा परिसरातील संबंधित उत्पादक केंद्रांतील पात्र शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी चितळे डेअरीच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा. तसेच, या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मे बी. जी. चितळे डेअरीकडून करण्यात आले आहे.
कोट ----
जातीवंत दुधाळ मुऱ्हा म्हशींच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी चितळे डेअरीचा पशुसंवर्धन विभाग सातत्याने कार्यरत आहे. काळानुरूप योजनेत सुधारणा करून आता वासरू संगोपन रेडी अनुदान योजनाही सुरू करण्यात आली आहे.
- निखिल चितळे,
भागीदार, बी. जी. चितळे डेअरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.