आळेफाटा, ता. १७ : दुष्काळ, चारा-पाण्याची संभाव्य टंचाई आणि जनावरांच्या संगोपनासाठी वाढणारा खर्च यामुळे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारातील गाय बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. एक लाख रुपयांपर्यंत भाव मिळणाऱ्या दुधाळ गायींचे दर घसरून ६० ते ७० हजार रुपयांवर आले आहेत.
बाजारात ३० ते ३५ हजार रुपये किमतीच्या गायी १४ ते १५ हजार रुपयांना देण्याची तयारी असूनही खरेदीदार मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पशुपालक आणि पशुधन व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
ग्रामीण भागात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी दुग्धव्यवसाय करतात. दूधविक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर शेतीचा खर्च आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. मात्र, पावसाच्या अनिश्चिततेमुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होत असून हिरव्या चाऱ्याची उपलब्धताही चिंतेचा विषय बनली आहे. सोयाबीन, बाजरी आणि मका या पिकांच्या उत्पादनाबाबत अनिश्चितता असल्याने जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे.
खर्च वाढला, उत्पन्न घटले
जनावरांसाठी चारा, पशुखाद्य, पाणी आणि औषधोपचारांवर मोठा खर्च करावा लागतो. चारा विकत घेण्याची वेळ आल्यास संगोपनाचा खर्च आणखी वाढतो. दूध उत्पादनातून मिळणारे उत्पन्न आणि जनावरांच्या देखभालीचा खर्च यांचा ताळमेळ बसविणे कठीण होत आहे. त्यामुळे काही पशुपालक जनावरे विकत आहेत. मात्र, अपेक्षित दर मिळत नसल्याने त्यांचे नुकसान होत आहे.
खरेदीदारांची संख्या रोडावली
चारा-पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास नव्याने खरेदी केलेल्या गायींचे संगोपन कसे करायचे? या चिंतेमुळे शेतकरी जनावरे खरेदी करण्यास टाळाटाळ करत आहेत. परिणामी, बाजारात जनावरांची आवक होत असली तरी खरेदीदारांची संख्या कमी झाली आहे. दरावर एकमत होत नसल्याने अनेक व्यवहार रखडत आहेत.
पशुधन व्यवसाय टिकवण्यासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविणे, पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे आणि अडचणीत असलेल्या पशुपालकांना मदत करणे आवश्यक आहे. अन्यथा, चारा-पाण्याच्या टंचाईमुळे जनावरे सांभाळणे कठीण होऊन बसले आहे. खाद्याच्याही किमती वाढल्या आहेत. त्यामुळे पोटच्या मुलाप्रमाणे जपलेले पशुधन विकण्याची वेळ आली आहे.
- शरद आरोटे, आळे (ता. जुन्नर)
08938
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.