मुक्तसंचार गोठा, दूध काढणी यंत्रासाठी
जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून अनुदान
शेतकऱ्यांनी २४ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : पशुपालकांच्या दुग्ध व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन दूध उत्पादन वाढविणे, पशुधनाची योग्य निगा राखणे तसेच पशुपालकांचा वेळ व श्रम वाचविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून मुक्तसंचार गोठा आणि दूध काढणी यंत्रासाठी अनुदान दिले जाणार आहे. दूध उत्पादकांनी २४ सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी, दूध उत्पादकांना जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून पशुसंवर्धन विभागामार्फत दुग्ध व्यवसायासाठी निधी दिला जातो. मुक्तसंचार गोठ्याच्या माध्यमातून जनावरांना मोकळ्या व हवेशीर वातावरणात ठेवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. पशुधनाच्या आरोग्य व व्यवस्थापनामध्ये सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
मुक्तसंचार गोठा उभारणीसाठी जिल्हा परिषद सेस निधीतून ५० टक्के किंवा २० हजार रुपये, यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे. दुग्ध व्यवसायातील श्रम कमी करण्यासाठी दूध काढणी यंत्र खरेदीसाठीही अनुदान उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा परिषद सेस निधीतून ६० टक्के किंवा १५ हजार रुपये, यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे.
या आधुनिक सुविधांमुळे दूध काढण्याची प्रक्रिया अधिक स्वच्छ, सुलभ व वेळेची बचत करणारी होण्यास मदत होणार आहे. पशुपालकांनी संबंधित योजनेची माहिती व अर्ज करण्यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयाशी संपर्क साधावा. योजनांचे अर्ज नजीकच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयामार्फत २४ सप्टेंबरपर्यंत स्वीकारण्यात येतील. पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषदेमार्फत आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.