पळसदेव, ता. १६ ः पुणे-सोलापूर महामार्गावरील डाळज नं. २ (ता. इंदापूर) येथे प्रवाशांच्या सोईसाठी सर्व प्रकारच्या एसटी थांबविण्याचे आदेश पुणे विभाग नियंत्रकांनी देवून ७ महिन्यांचा कालवधी उलटूनही येथे एसटी थांबत नसल्याने, ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
इंदापूर आगाराची एसटी वगळता येथे इतर कोणत्याच आगाराच्या एसटी बस थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. यामुळे येथून प्रवास करणाऱ्यांची मोठी गैरसोय होत असल्याने, ग्रामस्थांनी थेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
येथील डाळज क्र. १, २, ३, भादलवाडी, कुंभारगाव, कळस आदी गावांसह अनेक वाड्यावस्त्यांवरील नागरिकांना डाळज क्र. २ येथे एसटीचा थांबा महत्त्वाचा आहे. लोकांची गरज ओळखून एसटी कामगार संघटनेचे माजी अध्यक्ष हनुमंत ताटे, एसटीचे निवृत्त लेखापाल शांताराम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षांपासून येथील अजिनाथ जगताप हे येथे एसटी थांबा मंजुरीसाठी धडपडत आहेत. त्यांना परिसरातील ग्रामपंचायतीने एसटी थांबा मंजुरीसाठी पत्र दिले आहे. त्यांच्या या पाठपुराव्याला २९ जानेवारी २०२६ रोजी यश मिळाले. पुण्याच्या विभाग नियंत्रकांनी सर्व आगारव्यवस्थापक व इतर विभागांनाही पत्रव्यवहार करून येथे एसटी थांबवून प्रवाशांची चढ-उतार करण्याची सूचना दिली. मात्र त्यांच्या या सूचनेला आगार व्यवस्थापकांनी केराची टोपली दाखविली आहे.
पुणे किंवा सोलापूरहून येथे येणाऱ्या प्रवाशाला पळसदेव अथवा भिगवण येथील तिकीट काढावे लागत आहे. यासाठी त्याला किमान २० ते २५ रुपये जास्तीचे मोजावे लागत आहे. याशिवाय चालक व वाहकाला विनवणी करून अथवा हुज्जत घालून येथे जबरदस्ती गाडी थांबवावी लागत आहे. हा प्रकार नित्याचाच ठरलेला आहे. कारण वाहकाकडे असलेल्या तिकीट मशीनमध्ये डाळज क्र. २ गावाचा थांबा नोंदविला नसल्याने हा प्रकार घडत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता ग्रामस्थांनी थेट परिवहन मंत्र्याकडे निवेदनाद्वारे येथील एसटी थांब्याचा प्रश्न कायमचा सोडविण्याची मागणी केली आहे.
प्रवाशांची गैरसोय
डाळज क्र. २ येथील चौकापासून काही फुटांच्या अंतरावर असलेल्या एका खासगी ढाब्यावर नाश्ता व जेवणासाठी एसटी थांबा मंजूर असून, तेथे दररोज शेकडो बस थांबत असतात. मात्र येथे प्रवाशांना घेण्यास वाहक थेट नकार देतात. काही एसटी बस विरुद्ध दिशेने रस्ता ओलांडून ढाब्यावर येतात. प्रवाशांच्या सोईसाठी असलेली एसटी येथील प्रवाशांची गैरसोय करत असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.