दंडकारण्य अभियानातून अधिक
वृक्षलागवड करा : डॉ. सुधीर तांबे
ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : जागतिक तापमानवाढ, कमी पाऊस, वाढती उष्णता आणि दुष्काळ या समस्यांवर मात करण्यासाठी पर्यावरण संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. यंदा दंडकारण्य अभियानातून अधिकाधिक वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन आणि संवर्धन करावे, असे आवाहन दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.
संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावर दंडकारण्य अभियानाच्या नियोजनासाठी बैठक झाली. कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील घुले, प्रकल्पप्रमुख दुर्गाताई तांबे, शंकरराव खेमनर, सरपंच सोमनाथ गोडसे, गोरख नवले, गोरख सोनवणे, सुभाष सानप, योगेश पवार, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, प्रा. बाबा खरात, प्राचार्य दशरथ वर्पे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. तांबे म्हणाले, ‘‘माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राबविले जात असलेले दंडकारण्य अभियान पर्यावरण संवर्धनाची मोठी लोकचळवळ ठरली आहे. वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन ही मानवतेची गरज आहे. त्यामुळे या पावसाळ्यात प्रत्येकाने जास्तीत जास्त वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करावे. या अभियानातून सप्तशृंगी गडावर १०० हेक्टर क्षेत्रावर वृक्षारोपण करण्यात आले असून, अनेक वृक्ष जगले आहेत. तालुक्यातील विविध डोंगरांवर लावलेल्या वृक्षांचे विविध सहकारी संस्थांनी संगोपन केले आहे. यामध्ये प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. ‘एक विद्यार्थी, दोन झाडे’ ही संकल्पना राबविताना प्रत्येक नागरिकाने वन विभागाच्या, गावातील मोकळ्या जागांवर तसेच आपल्या बांधावर वृक्षारोपण करावे,’’ असेही त्यांनी सांगितले.
प्राचार्य दशरथ वर्पे यांनी प्रास्ताविक केले. पांडुरंग पाटील घुले यांनी आभार मानले.
चौकट
वनश्री पुरस्काराबद्दल मालदाडचा गौरव
मालदाड येथील ग्रामस्थ आणि सरपंचांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण आणि संवर्धन केले असून, हा पॅटर्न आदर्शवत ठरला आहे. वृक्षारोपणामुळे अनेकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या असून, गावात ६० लाख रुपयांचा रोजगार निर्माण झाला. तसेच १४ एकर क्षेत्रावर केलेल्या वृक्षलागवडीतून शेवगा, आंबा आदींपासून गावाला उत्पन्न मिळाले. या कामाची दखल घेऊन गावाला ‘वनश्री पुरस्कार’ मिळाल्याबद्दल सरपंच गोरख नवले यांचा माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.