पालकमंत्री भरणे
आज वाशीम दौऱ्यावर
वाशीम : कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे शुक्रवारी (ता. १४) वाशीम जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थित राहून ते पत्रकार परिषद घेतील. त्यानंतर जिल्हा गुंतवणूक परिषद, फार्मर ग्रुप लीग पारितोषिक वितरण तसेच विविध उद्घाटन कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. वाशीम शहरातील विविध विकासकामांची पाहणी करून ते कारंजा येथे वन पर्यटन केंद्र, गुरू मंदिर व कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. सायंकाळी मंगरूळपीर येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन, विविध सौंदर्यीकरण कामांचे लोकार्पण करून रात्री वाशीम येथे मुक्काम करतील.
मलकापुरात उद्या
राष्ट्रभक्तीचा जागर
मलकापूर, जि. बुलडाणा ः देशाच्या ७९व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील छत्रपती शिवराय प्रतिष्ठान तथा भातृ मंडळाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. १५) वृक्ष लागवड, वृक्षसंवर्धन व पर्यावरण रक्षणासह राष्ट्रभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे यांच्या हस्ते होणार असून, जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. कार्यक्रमांतर्गत दुपारी ४ वाजता श्री छत्रपती शिवराय प्रतिष्ठान येथून वृक्षदिंडी काढण्यात येणार आहे. या दिंडीचा समारोप सायंकाळी ६ वाजता भातृ मंडळ येथे होईल. त्यानंतर सायंकाळी ७.३० ते रात्री ९.३० या वेळेत ‘जागर राष्ट्रभक्तीचा’ हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे. अकोला येथील स्वरमाला मेलोडीजतर्फे हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
शंभर ग्रामपंचायतींचा
आज होणार गौरव
बुलडाणा ः जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासीबहुल, तांडावस्ती तसेच डोंगराळ भागातील ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सीईओ संग्राम अभियान (संवेदनशील ग्राम) २०२५-२६ राबविण्यात आले. या अभियानात जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला असून, स्वयंमूल्यांकनाच्या आधारे त्यापैकी १०० ग्रामपंचायती पुरस्कारासाठी पात्र ठरल्या आहेत. या पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचा गौरव सोहळा शुक्रवारी (ता. १४) सकाळी ११ वाजता बुलडाणा येथील गर्दे वाचनालय सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास पालकमंत्री मकरंद जाधव (पाटील), केंद्रीय राज्यमंत्री (आयुष) स्वतंत्र प्रभार प्रतापराव जाधव तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. सोहळ्यात संबंधित सरपंच अथवा प्रशासक आणि ग्रामपंचायत सचिवांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक पात्र ग्रामपंचायतीला ५१ हजार रुपयांचा धनादेश प्रदान केला जाणार आहे. दुर्गम व वंचित भागातील ग्रामपंचायतींनी विकास प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, प्रशासन अधिक संवेदनशील व लोकाभिमुख व्हावे आणि ग्रामस्तरावरील विकासकामांना गती मिळावी, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.