सेवागिरी शेतीनिष्ठ पुरस्काराने दत्तात्रय जाधव यांचा गौरव
पुसेगाव, ता. ३० : येथील प्रगतशील युवा शेतकरी दत्तात्रय संपत जाधव यांना पुसेगावच्या श्री सेवागिरी यात्रा महोत्सवात शेतीतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल श्री सेवागिरी शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
पुसेगाव येथे दत्तात्रय जाधव यांनी शेती व्यवसाय करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपल्या शेतात नावीन्यपूर्ण प्रयोग राबवून कमी कालावधीत उत्पन्न देणाऱ्या भाजीपाला पिकांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांचा आदर्श घेऊन इतर ठिकाणचे शेतकरीही प्रगतीच्या मार्गावर आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल पुसेगाव देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री सेवागिरी शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार २०२५-२६ प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले.
श्री. जाधव यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे, आमदार मनोज घोरपडे, देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराबद्दल त्यांचे जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, देवस्थानचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, संतोष ऊर्फ बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव, प्रभारी सरपंच विशाल जाधव आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.
B01318
पुसेगाव : मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना दत्तात्रय जाधव.