दौंड , ता. ५ : बनावट कागदपत्रांआधारे मिळविलेले कुणबी जातीचे प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविल्याने दौंड नगरपालिकेचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी एका आदेशाद्वारे सदस्यत्व रद्द केले आहे.
दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी बुधवारी (ता. ५) याबाबत माहिती दिली. दौंड नगरपालिकेच्या डिसेंबर २०२५ मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ - अ मधून रोहित राजेश पाटील यांनी निवडणूक उमेदवारी अर्जासमवेत दौंड उपविभागाचे प्रांताधिकारी यांनी दिलेला कुणबी दाखला जोडून निवडणूक लढविली होती. नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) या आरक्षित जागेवरून नागरिक हित संरक्षण मंडळाचे उमेदवार म्हणून पाटील हे ७३३ मतांच्या फरकाने विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात निवडणूक लढविलेल्या काही पराभूत उमेदवारांनी रोहित यांचे वडील तथा माजी स्वीकृत नगरसेवक राजेश सदानंद पाटील यांच्या शालेय दाखल्यावर ‘ख्रिश्चन’ अशी नोंद असल्याने त्याच्या आधारे कुणबी दाखल्यावर आक्षेप घेत तक्रार केली होती. रोहित यांनी सादर केलेली वंशावळ बनावट असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने चौकशी करून व सुनावणी घेऊन रोहित पाटील यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले होते. त्यानंतर मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल सादर केला होता.
दरम्यान, मंगळवारी (ता. ४) जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रोहित राजेश पाटील यांचा जातीचा दाखला अवैध ठरविल्याने त्यांचे दौंड नगरपालिकेचे सदस्यत्व रद्द केले आहे. तसेच प्रभाग क्रमांक ४ - अ मधील नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीची जागा रिक्त असल्याचे डुडी यांनी आदेशात नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.