दौंड, ता. २१ : शहरात खून झालेल्या ज्येष्ठ महिलेचे शिर नदीपात्रात सापडले. प्लास्टिकच्या पिशवीत दगडांसह शिर टाकून ती पिशवी नदीपात्रात फेकण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
शहरातील नगर मोरी चौकाजवळ असलेल्या रेल्वेच्या ‘ आरबी-वन ’ वसाहतीतील एका पडक्या खोलीत बुधवारी (ता. १९) सुमन किसन शिंदे (वय ७०) यांचा शिरविरहित मृतदेह आढळला होता. या खूनप्रकरणी पोलिसांनी विक्रम ऊर्फ विकी धनराज आल्हाट (वय २६, रा. समतानगर, दौंड) आणि प्रसाद बाबूलाल चव्हाण (वय २२, रा. आरबी-वन वसाहत, नगर मोरी, दौंड) या दोन संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत संशयितांनी सुमन शिंदे यांचे शिर नदीपात्रात फेकल्याची माहिती दिली. त्यानुसार शुक्रवारी (ता. २१) पोलिसांनी नदीपात्रात शोधमोहीम राबविली. सायंकाळी सहाच्या सुमारास पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांच्या मदतीने प्लास्टिकच्या पिशवीत असलेले शिर नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. शिरासोबत पिशवीत दगडही भरण्यात आले होते. पोलिसांनी हे शिर विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले आहे. संशयित आरोपी हे सुमन शिंदे यांच्या खोलीजवळ लघुशंका करीत तसेच दारूच्या रिकाम्या बाटल्या फोडून त्यांना सतत त्रास देत होते. शिंदे यांनी दोघांना याबाबत जाब विचारला होता. त्याचा राग मनात धरून संशयितांनी त्यांचा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान दौंड पोलिसांनी दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना सोमवार (ता. २४) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती तपास अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे यांनी दिली.