सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ७ ः- दिल्ली विद्यापीठाच्या साऊथ कॅम्पस शेजारी सत्यनिकेतन भागात काल (ता. ६) पाच मजली इमारत कोसळण्याच्या घटनेत सात विद्यार्थ्यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर दिल्लीत बेकायदा आणि असुरक्षित इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेनंतर दिल्ली महापालिकेच्या पाच अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले असून या प्रकरणात इमारतीच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. आहे तसेच या परिसरासह दिल्लीतील असुरक्षित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे.
दिल्ली विद्यापीठाच्या साऊथ कॅम्पसशेजारी सत्यनिकेतन भागात काल (ता. ६) दुपारी कोसळलेल्या इमारतीत दिल्ली विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी होस्टेल चालवले जात होते. रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही इमारत अचानक कोसळली. इमारतीच्या तळमजल्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून खोदकाम सुरू होते. इमारतीचे स्तंभ कमकुवत झाल्यामुळे आणि खोदकामादरम्यान एक स्तंभ सरकल्यामुळे या संपूर्ण इमारतीचे काही क्षणांमध्ये ढिगाऱ्यामध्ये रूपांतर झाले. यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. आतापर्यंत१२ जणांना सुरक्षित काढण्यात आले आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली बरेच विद्यार्थी अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
गेल्या २४ तासांपासून घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशामक दल, दिल्ली पोलिस आणि स्थानिक नागरिक मदतकार्यात गुंतले आहेत. ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्यासाठी जेसीबी आणि आधुनिक उपकरणांचा वापर केला जात आहे. ‘एनडीआरएफ’चे महासंचालक नरेंद्र बुंदेला यांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रोन आणि अन्य उपकरणांच्या साहाय्याने ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेतला जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी
सुरक्षेचा उपाय म्हणून शेजारची इमारतही रिकामी करण्यात आली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज सकाळी घटनास्थळाची पाहणी केली आणि दुर्घटनेच्या न्यायदंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले. असुरक्षित इमारतीमध्ये कोणालाही राहू दिले जाणार नाही. या दुर्घटनेतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेल्या नागरिकांसाठी सरकारने महाविद्यालयांच्या वसतिगृहांमध्ये तात्पुरती निवासव्यवस्था केली आहे. त्यांच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी सरकार घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या दुर्घटनेनंतर इमारतीचा मालक हरीराम बन्सल हा फरार झाला होता. त्याच्यावर निष्काळजीपणा आणि लोकांचा जीव धोक्यात घातल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी हरियानाच्या भिवाडी येथून ताब्यात घेतले.
परिसरातील अन्य इमारती सील
दरम्यान, या दुर्घटनेनंतर सत्यनिकेतन परिसरातील आसपासच्या इमारती सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच बेकायदा इमारतींची तपासणीही सुरू करण्यात आली आहे. तसेच दिल्ली महानगरपालिकेने चार मजल्यांपेक्षा जास्त मजल्यांच्या सर्व बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच सत्य निकेतन परिसरातील इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर दिल्ली सरकारने सार्वजनिक वापरातील इमारतींच्या सुरक्षेबाबत कठोर धोरण आखण्याचा निर्णय घेतला आहे. पीजी, नर्सिंग होम, शाळा किंवा अन्य सार्वजनिक वापराच्या इमारतींचे ठराविक कालावधीनंतर स्ट्रक्चरल ऑडिट आणि सुरक्षा प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींमध्ये कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक कामकाज अथवा वास्तव्याला परवानगी दिली जाणार नाही, अशी घोषणा दिल्ली सरकारने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.