सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ७ : दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात वसतिगृहाची इमारत कोसळून किमान पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर राजधानीतील राजकीय वातावरण तापले आहे. विद्यार्थ्यांच्या निवासाशी संबंधित या दुर्घटनेवरून विरोधकांनी दिल्लीतील भाजप सरकारच्या कारभारावर आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या दुर्घटनेवरून भाजप सरकारवर जोरदार टीका केली. ‘‘दुर्घटना घडण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नाहीत आणि दुर्घटनेनंतर केवळ निवेदने देऊन काही अधिकाऱ्यांवर जबाबदारी ढकलली जाते,’’ असा आरोप त्यांनी केला. सत्य निकेतनमधील घटना ही एकच दुर्घटना नसल्याचे सांगताना त्यांनी गेल्या चार महिन्यांतील सैदुलाजाब आणि हौज राणी येथील दुर्घटनांचा उल्लेख केला. प्रत्येक वेळी नागरिकांचे जीव जातात; मात्र जबाबदारी निश्चित करण्याची कारवाई होत नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
काँग्रेसचे नेते आणि ‘एनएसयूआय’चे प्रभारी कन्हैया कुमार यांनीही दिल्ली सरकारवर टीका केली. ‘‘दिल्लीतील महापौर, आमदार, सरकार आणि नायब राज्यपाल भाजपचे असूनही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे. दिल्ली विद्यापीठातील अत्यल्प विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ‘पीजी’ म्हणून राहावे लागते; मात्र या निवासस्थानांच्या सुरक्षिततेकडे प्रशासनाचे लक्ष नाही,’’ असा दावा त्यांनी केला.
भाजपला देशभर पक्षाची कार्यालये उभारता येतात, नवीन संसद भवन आणि खासदारांसाठी घरे उभारता येतात; मात्र विद्यार्थ्यांसाठी पुरेशी वसतिगृहे का उभारली जात नाहीत, असा सवाल कुमार यांनी केला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) केवळ आंदोलनाचे नाटक करीत असल्याची टीकाही त्यांनी केली. मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचे आव्हान कन्हैया कुमार यांनी दिले.
‘प्रशासनाचा डोलारा कोसळला’
राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते मनोज झा म्हणाले, ‘‘हा पहिला अपघात नाही. आपण अपघातांची वाट पाहणारा देश झालो आहोत. विद्यार्थ्यांची संख्या वाढत असताना त्यांच्यासाठी पुरेशी वसतिगृहे कुठे आहेत?’’ सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे. आता दुर्घटनेनंतर केवळ कनिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करून वरिष्ठांना जबाबदारीपासून दूर ठेवले जाईल, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
‘आप’चाही हल्लाबोल
आम आदमी पक्षाचे (आप) दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी नगरविकास मंत्री आशिष सूद यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित केला. सत्य निकेतन दुर्घटनेच्या वेळी सूद कुठे आहेत, असा सवाल त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे केला. सूद यांनी दुर्घटनेबाबत दुपारी तीनच्या सुमारास एक पोस्ट केल्यानंतर ते कुठेही दिसले नसल्याचा दावा भारद्वाज यांनी केला. सूद हे भाजपचे गोवा प्रभारीही आहेत. ते रविवारी दुपारी विमानाने गोव्याला गेले होते का? दिल्लीतील दुर्घटनेच्या वेळी नगरविकास मंत्री राजधानीत असणे आवश्यक असल्याचे सांगत मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी त्यांना तातडीने दिल्लीत परत बोलवावे, अशी मागणी त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.