हिर्डोशी, ता. ८ : भोरमार्गे कोकणात जाणारा वरंधा घाट रस्ता गेली आठ वर्षे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने विशेषतः गणेशोत्सव काळात बंद राहिला आहे. एसटी सेवाही बंद असल्याने कोकणात ये-जा करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे नागरिकांनी भोर-महाड मार्गावर एसटी सुरू करण्याची मागणी केली आहे.
भोर हद्दीतील रस्ता रुंदीकरणामुळे एसटी बंद असल्याने प्रवाशांना खासगी वाहनांनी महागडा आणि धोकादायक प्रवास करावा लागत आहे. याचा फटका शिक्षण, आरोग्य आणि व्यापाराला बसत असून निगुडघर ते वरंधा घाटादरम्यानच्या गावांची दळणवळणाची सोय खुंटली आहे. रायगड हद्दीतील वरंधा घाटाचा रस्ता वाहतुकीसाठी योग्य असल्याचे पत्र राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, रोहा कार्यालयाकडून दिले आहे. उंबर्डे ते शिरगाव दरम्यानचा जुना रस्ताही सुस्थितीत आहे. तसेच निगुडघर ते शिरगाव येथील काँक्रिटीकरणाचे बरेच काम झाले आहे. धोकादायक ठिकाणच्या संरक्षण भिंती व इतर कामे अपुरी आहेत. त्यामुळे पुणे प्रशासनाकडून एसटीला हिरवा कंदील मिळत नाही.
पुण्यासह इतर ठिकाणी नोकरीनिमित्त असणारे कोकणातील ग्रामस्थ सणानिमित्त गावी जात असतात. रस्त्याचे काम ७० टक्के झाले असून भोरची एसटी हिर्डोशीपर्यंत येत आहे. हिर्डोशी ते शिरगाव दरम्यान धोकादायक ठिकाणी उपाययोजना करून गणेशोत्सव काळात एसटी सुरू करण्याची मागणी वरंध, बिरवाडी परिसरासह भोर, महाड, खेड, दापोली आदी तालुक्यांतील नागरिकांकडून होत आहे.
रायगड हद्दीतील रस्ता योग्य असल्याचे पत्र प्रशासनाने दिले असून भोर हद्दीत धोकादायक असणाऱ्या वाघजाई मंदिर परिसरात रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. महाबळेश्वर, आंबेनळी, चिपळूण, कोल्हापूर या ठिकाणी रस्त्याची कामे सुरू असताना एसटी सेवा सुरू असते. रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांची भेट घेऊन एसटी सुरू करण्याची मागणी करणार आहोत.
- डॉ. नितीन देशमुख, वरंध
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.